पॅरिस : जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सर्वात मोठा विजय मिळवताना क्ले कोर्ट किंग असे बिरुद मिळवणाºया राफेल नदालचा चार सेटमध्ये पराभव केला. या धमाकेदार विजयासह जोकोविचने फ्रेंच ओपनच्या अंतिम लढतीत प्रवेश केला असून जेतेपदासाठी त्याला आता स्टेफोनोस सिटसिपासविरुद्ध भिडावे लागेल.
विश्वविक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या नदालच्या मोहिमेला जोकोविचने धक्का दिला. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना जोकोविचने ३-६, ६-३, ७-६ (७-४), ६-२ असा झुंजार विजय मिळवला. फ्रेंच ओपनच्या इतिहासात तब्बल १४व्यांदा उपांत्य फेरी गाठलेल्या नदालचा पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पराभव झाला. याआधी त्याने कधीही उपांत्य तसेच अंतिम सामना गमावला नव्हता.
त्याचबरोबर, फ्रेंच ओपनमध्ये नदालला दोनवेळा नमवणारा जोकोविच पहिला टेनिसपटूही ठरला. तब्बल ४ तास ११ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात नदालने शानदार सुरुवात केली होती. नदालच्या पहिल्याच सर्विसवर जोकोविचने ब्रेक पॉइंट मिळवला, मात्र हा पॉइंट वाचवत नदालने ५-० अशी भक्कम आघाडी मिळवली. त्यावेळीच जोकोविचचा पराभव होणार असे दिसत होते. मात्र जोकोविचने यानंतर जो काही खेळ केला त्याने टेनिसप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
जोकोविचने फोरहँडवर जास्त भर देतानाच वॉली आणि ड्रॉप शॉट्सचा चतुराईने वापर करत नदालला निष्प्रभ केले. पहिला सेट गमावल्यानंतर जोकोने सलग तीन सेट जिंकत फ्रेंच ओपन इतिहासातील सर्वात खळबळजनक विजयाची नोंद केली.
या विजयासह जोकोविचने नदालविरुद्धचा जय-पराजयाचा रेकॉर्ट ३०-२८ असा केला. ग्रँडस्लॅममध्ये जोकोने नदालला सातव्यांदा पराभूत केले असून फ्रेंच ओपनमध्ये दोघेही नवव्यांदा एकमेकांविरुद्ध खेळत होते. यामध्ये जोकोविचने केवळ दुसऱ्यांदा नदालला नमवले. मात्र फ्रेंच ओपनमध्ये नदालला दोनवेळा पराभूत करणारा जोकोविच पहिला टेनिसपटू ठरला हे विशेष.