पॅरिस : जर्मनीचा द्वितीय मानांकित अॅलेक्झांडर ज्वेरेव याने आज येथे फ्रेंच ओपनमध्ये जबरदस्त मुसंडी मारताना सलग तिसऱ्या विजयासह प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला गटात अमेरिकेच्या १३ व्या मानांकित मेडिसन कीज हिनेही विजयी घोडदौड कायम ठेवली.पुरुष एकेरीत ज्वेरेव याने रशियाच्या कारेन खाचानोव याचा चौथ्या फेरीत ४-६, ७-६, २-६, ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. आता त्याची लढत डोमिनिक थिएम याच्याविरुद्ध होईल. १९३७ नंतर फ्रेंच ओपन जिंकणारा जर्मनीचा पहिला खेळाडू ठरण्याची मनीषा बाळगणारा ज्वेरेव त्याच्या १२ व्या प्रयत्नात प्रथमच ग्रँडस्लॅमच्या अंतिम आठ खेळाडूंत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. ज्वेरेवने याआधी स्पर्धेत दुसान लाजोविच आणि दामिर जुमहुर यांच्याविरुद्धही पिछाडीवर पडल्यानंतर जबरदस्त मुसंडी मारत विजय नोंदवले होते. त्याने दोन ब्रेकपॉइंट वाचवल्यानंतर एक बिनतोड सर्व्हिस करीत सेट आपल्या नावावर केला. त्याने सामन्यादरम्यान ६३ विनर आणि १७ वेळेस बिनतोड सर्व्हिस केली.पुरुषांच्या एकेरीत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार सर्बियाच्या नोवाक जोकोविचने स्पेनच्या फर्नांडो वर्दास्कोचा सरळ तीन सेटमध्ये ६-३, ६-४, ६-२ असा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला़ दुसरीकडे इटलीच्या मार्को सिंचिनाटोने डेव्हिड गॉफिनला ७-५, ४-६, ६-०, ६-३ असे नमविले़ महिला गटात अमेरिकेच्या १३ व्या मानांकित मेडिसन कीज हिने रोमानियाच्या मिहाएला बुजार्नेस्कू हिच्यावर ६-१, ६-४ अशी सरळ सेट्समध्ये मात करीत प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गेल्या वर्षी अमेरिकन ओपनमध्ये उपविजेतेपद पटकावणाºया कीजचा सामना आता झेक प्रजासत्ताकच्या २६ व्या मानांकित बारबोरा स्ट्राइकोवा आणि कजाकिस्तानच्या ९८ व्या मानांकित यूलिना पुतिंतसेवा यांच्या लढतीत विजयी ठरणाºया खेळाडूविरुद्ध होईल.
फ्रेंच ओपन : ज्वेरेवकडून कारेनला पराभवाचा धक्का; नोव्हाक, मार्कोचा पुढच्या फेरीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 5:46 AM