पॅरिस : लाल मातीचा बादशहा स्पेनचा राफेल नदाल आणि स्टेफनोस सिटसिपास यांनी आपापल्या सामन्यात बाजी मारत फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. रोलँड गॅरोमध्ये २००८ साली उपांत्य सामन्यात राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच भिडले होते. पाचव्या मानांकित सिटसिपासने अनपेक्षित कामगिरी करताना दुसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेव याचे तगडे आव्हान ६-३, ७-६ (३), ७-५ असे परतवले. यासह सिटसिपासने चौथ्यांदा एखाद्या ग्रॅण्डस्लॅमची उपांत्य फेरी गाठली आहे. नदालने उपांत्यपूर्व लढतीत अर्जेंटिनाचा दिएगो श्वार्त्झमन याच्यावर ६-३, ४-६, ६-४, ६-० ने मात करीत उपांत्य फेरी गाठली. झ्वेरेवने ४६ व्या मानांकित अलेजांद्र डेविडोविच फोकिना याचा ६-४, ६-१, ६-१ असा धुव्वा उडवला.
महिला गटात मारिया सक्कारीने गत विजेती इगा स्वियातेकचा ६-४,६-४ ने पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. यंदा या स्पर्धेला नवा चॅम्पियन मिळणार आहे. उपांत्य फेरी गाठणाऱ्या चारही महिला टेनिसपटू पहिल्यांदा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाल्या.