गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आता दोन डझन सुवर्णपदकं जमा झाली आहेत. टेबल टेनिसपटू मनिका बत्रानं 'गोल्डन स्मॅश' लगावला. त्याशिवाय, भारताच्या शिलेदारांनी आत्तापर्यंत १४ रौप्य आणि १७ कांस्यपदकांची कमाई केली आहे. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचा आजचा दहावा दिवस भारतासाठी 'सोनियाचा दिनु' ठरला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच देशाचं प्रतिनिधित्व करणारी विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम हिनं 'सोनेरी' ठोसा लगावला. त्यानंतर, पुरुषांच्या ५२ किलो वजनी गटात गौरव सोळंकीनंही सोनेरी यश मिळवलं. नेमबाजीत संजीव राजपूतनं आणि भालाफेकीत नीरज चोप्रानं सुवर्णपदकावर नाव कोरलं. कुस्तीतील सोनेरी कामगिरीची मालिका सुमित मलिकने पुढे सुरू ठेवली. तर, विनेश फोगाटनंही सुवर्णपदक पटकावलं.
या सुवर्ण षटकारानंतर, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा भारताला 'सातवे आसमां पर' घेऊन गेली. पहिल्या गेममध्ये १-६ अशी पिछाडीवर पडलेल्या मनिकानं झुंजार पुनरागमन केलं आणि हा गेम ११-७ नं जिंकला. त्यानंतर तिचा आत्मविश्वास इतका उंचावला की, इंग्लंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला डोकं वर काढण्याची संधीच तिने दिली नाही. पुढचे तीनही गेम खिशात टाकत तिनं सुवर्णपदक जिंकलं.