उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याप्रकरणी टेनिस सुंदरी मारिया शारापोव्हा ( Maria Sharapova) हिच्यावर बंदी घातली गेली आहे. रशियन टेनिस स्टार मारिया सध्या कोर्टपासून दूर असली तरी ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर रशियाची माजी खेळाडू मारिया, फॉर्म्युला वन रेसर मायकेल श्युमाकर आणि अन्य ११ जणांविरोधात फसवणूक व गुन्हेगारी कटाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीच्या एका महिलेने या सर्वांवर फसवणूकीची तक्रार दाखल केल्यानंतर हे FIR नोंदवण्यात आले आहे.
शेफाली अगरवाल असे या महिलेचे नाव आहे आणि नवी दिल्ली येथील चत्तारपूर मिनी फार्म येथे ती राहते. शारापोव्हाच्या नावाच्या प्रोजेक्टमध्ये तिने अपार्टमेंट बूक केले होते आणि श्युमाकर याच्या नावाच्या टॉवरमध्येही तिने अपार्टमेंट बूक केले होते. २०१६मध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु अजूनही तो तसाच आहे. त्यामुळे महिलेने ही तक्रार दाखल केली.
आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी या फसवणूकीत संबंधित संस्थेला सहाय्य केल्याचा आरोप महिलेने केला आहा. तिने गुरुग्राम कोर्टात M/S Realtech Development and Infrastructure (INDIA) Pvt. Ltd सह शारोपाव्हा व श्युमाकर यांच्यावर ८० लाखांच्या फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. यात त्यांनी असे म्हटले की गुरुग्राम येथील सेक्टर ७३ मधील शारापोव्हाच्या नावाच्या प्रोजेक्टमध्ये तिने व तिच्या पतीने अपार्टमेंट बूक केले, परंतु व्यावसायिकाने त्यांची फसवणूक केली.
"आम्हाला जाहिरातींद्वारे प्रकल्पाची माहिती मिळाली. प्रकल्पाची छायाचित्रे व आकर्षक ऑफर पाहिल्यानंतर आम्ही कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला. पण, ही सर्व आश्वासने खोटी होती," असं तिने तक्रारीत म्हटले आहे. शारापोव्हा व श्युमाकर यांनी हे या प्रकल्पाचे प्रमोटर होते. माजी टेनिस स्टार शारापोव्हाने प्रकल्प स्थळी भेट दिली होती आणि टेनिस अकादमी आणि स्पोर्ट्स स्टोअर उघडण्याचे आश्वासन दिले होते, असे आरोप महिलेने केले आहेत.
इतकेच नव्हे. प्रकल्पाच्या brochure मध्ये तिने या प्रकल्पात घर खरेदी करणाऱ्यांसोबत डिनर करणार असल्याचेही वचन दिले होते. हे सर्व प्रकल्पाचे प्रमोशन होते आणि ते कधीच झाले नाही, असा दावाही महिलेने केला आहे. बादशाहपूर पोलीस ठाण्यात IPC कायद्यांतर्गत ३४, १२०-बी, ४०६ आणि ४२० असे कलम लावण्यात आले आहेत.