- अनन्या भारद्वाज (मुक्त पत्रकार)कोमट यश हे अपयशापेक्षा वाईट असतं आणि त्याच्या वाट्याला तर कायम कोमटच यश आलं. त्यापेक्षा खणखणीत अपयश कदाचित त्यानं जास्त मानानं मिरवलं असतं; पण ना धड लखलखीत यश, ना आदळून तोडूनफोडून टाकणारं अपयश. मिळालं ते क्रमांक दोनचं गुळमुळीतच यश. चार वर्षांपूर्वी तर त्यालाही वाटलं होतं, संपलो आपण. अर्थात त्याला वाटो, ना वाटो, ‘तो’ संपला असल्याची खात्री जगात अनेकांना होती.
त्याला मात्र हवंच होतं निरोपापूर्वी तरी यशाचं शिखर; पण शरीराचं काय करणार? ते थकायला लागलं, वयाची चाळीशी उलटली, चेहऱ्यावरची दाढीची खुंटं पांढरी झाली... आणि दोन दशक सतत खेळल्यानं थकलेलं शरीरही म्हणत होतं, आता बास! आणि नेमका जगभरात अनेकांच्या वाट्याला आला तसा त्याच्याही वाट्याला कोरोना आला. घरात बसणं भाग होतं. तेव्हा त्याला एक योगप्रशिक्षक सापडला. आठवड्यातून चार दिवस ९० मिनिटं तो नेमानं योगाभ्यास करू लागला. त्याच्या शरीराची ताकद तर वाढलीच; पण स्वत:चा हरवलेला सूर त्याला सापडायला लागला. मनाचं भिरभिरं शांत व्हायला लागलं आणि ‘फोकस’ वाढला.
च महिन्यांत एकही सामना न जिंकलेला तो ऑस्ट्रेलियन डबल्ससाठी कोर्टवर उतरला तेव्हा (टेनिसच्या दृष्टीने) हा म्हातारा जिंकेल यावर कुणीही विश्वास ठेवला नसता. पण तो जिंकला! वयाच्या ४३व्या वर्षी टेनिसच्या इतिहासातला सर्वाधिक वयस्क असलेला खेळाडू म्हणून जिंकला, ‘ओल्डेस्ट नंबर वन’ ठरला. त्यानंतरच्या भाषणात स्वत:ची प्रोसेस मांडताना तो जे सांगत होता ते विलक्षण आहे. तो म्हणाला, ‘वाट्याला जे जे येईल ते ते सोसत राहण्याची चिकाटी मला पुढे पुढे ढकलत राहिली. मलाही वाटत होतं की थांबावं; पण आत काहीतरी होतं, जे म्हणायचं, तू अजून जिंकलेला नाहीस! आपण आपलं ऐकावं, सांगता नाही येत आयुष्य कधी बदलेल, कधी जादू होईल आणि जगणं बदलून जाईल!’ जगणं असं बदलण्याची, कोमट यश कधीतरी खणखणीत यशात बदलेल याची वाट पाहत तो झुंजत राहिला. आणि शेवटी चॅम्पियन झालाच!म्हणून तर तो सांगतो, ४३ हे वय नाही.. माझी लेव्हल आहे! आणि त्याचा चाळिशीतला पुनर्जन्मही.. रोहन बोपन्ना त्याचं नाव!