नवी दिल्ली : अंकिता रैना हिने दडपणातही उत्कृष्ट कामगिरी करीत जागतिक क्रमवारीत १२० व्या स्थानावर असलेल्या लिन झू हिचा पराभव केला. तथापि, दुहेरीत अपयश येताच भारताला चीनविरुद्ध आशिया ओशियाना ग्रुप वन फेडरेश्न कप टेनिस लढतीत बुधवारी चीनकडून १-२ असा पराभवाचा धक्का बसला.करमन कौर थंडी हिने सुरुवातीचा सामना गमविल्यानंतर विश्व क्रमवारीत २५३ व्या स्थानावर असलेल्या अंकिताने शानदार खेळ करीत आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या झू ला ६-३. ६-२ ने नमवून बरोबरी साधून दिली. त्यानंतर अंकिता आणि प्रार्थना ठोंबरे यांच्या जोडीला दुहेरी लढतीत वांग आणि झाओशुआन यांग या जोडीने ६-२,७-६ ने नमविले. पहिल्या लढतीत करमनचा वांगने ६-२, ६-२ असा सरळ सेटस्मध्ये पराभव केला होता.भारत उद्या ‘करा किंवा मरा’सामन्यात उझबेकिस्तानविरुद्ध खेळेल. उझबेकिस्तान संघाने याआधी हाँगकाँगवर ३-० ने एकतर्फी मात केली. दोन्ही पूलमधील विजेता संघ विश्व प्ले आॅफसाठी पात्र ठरणार आहे.अंकिताचा लिनवर चार सामन्यात हा पहिला विजय होता. याआधी ती टूर स्पर्धेत दोनदा आणि फेडरेशन चषकात एकदा लिनकडून पराभूत झाली होती. अंकिताने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखून लिनला सावरण्याची संधी दिली नव्हती. लिनच्या फोरहॅन्डवरील चुकांचाही अंकिताला लाभ झाला. चीन संघाचे मंगळवारी येथे आगमन झाल्यानंतरही एका दिवसात खेळाडू येथील वातावरणाशी एकरूप झाले, हे विशेष. (वृत्तसंस्था)
अंकिताच्या विजयानंतरही भारत पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 3:38 AM