इस्लामाबाद - भारत-पाकिस्तान या ऐतिहासिक डेव्हिस चषक सामन्यासाठी पाकिस्तान टेनिस महासंघाला (पीटीएफ) खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तानमधून पासची मागणी करण्यात येत आहे. पण, इस्लामाबाद शहरात सामन्याचा कोणताही प्रचार झालेला नसल्याने या लढतीसाठी या शहराकडे यजमानपद आहे, असा विश्वास बसणेही कठीण आहे.
इस्लामाबाद या सुंदर शहरात या सामन्याचा एकही फलक लागलेला नाही. त्यामुळे भारतीय संघ ६० वर्षांनी येथे आला आहे हे समजत नाही. इस्लामाबाद क्रीडा परिसरात ही लढत होणार असली तरी तेथेही कोणतीही वातावरण निर्मिती झालेली नाही. हा परिसर स्थानिक माध्यमांच्याही आवाक्याबाहेर आहे.
पाकिस्तान टेनिस महासंघाला या सामन्यामुळे देशातील टेनिसला नवसंजीवनी मिळण्याची आशा आहे. पण ब्रँड, जाहिरात, मार्केटिंग, मुलाखतींच्या माध्यमातून या सामन्याचा आवश्यक तेवढाही प्रचार झालेला नाही. सामन्याच्या दिवशी म्हणजेच शनिवार, रविवारी केवळ ५०० पाहुणे परिसरात असतील. सुरक्षा एवढी कडेकोट आहे की, भारतीय खेळाडूंना पाकिस्तानच्या प्रसिद्ध आदरातिथ्याचाही लाभ घेत येत नाही. त्यांना केवळ सामन्याचे ठिकाण ते हाॅटेलपर्यंत जाण्याचीच परवानगी आहे.
भारतीय उच्चायोगाकडून संघाचे स्वागत६० वर्षांनी पाकिस्तानमध्ये आलेल्या भारतीय डेव्हिस संघाचे भारतीय उच्चायोगाने पाकिस्तानमध्ये स्वागत केले. पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त गीतिका श्रीवास्तव यांनी बुधवारी भारतीय खेळाडू आणि अधिकाऱ्यांचे स्वागत केले. याआधी १९६४मध्ये भारतीय डेव्हिस संघ पाकिस्तानमध्ये आला होता. दोन्ही देशांतील राजनैतिक तणावामुळे क्रीडा संबंधही रोखले गेले आहेत. श्रीवास्तव म्हणाल्या की, भारतीय संघाचे स्वागत करणे अभिमानास्पद आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे. भारतीय संघ दीर्घकाळानंतर पाकिस्तानात आला आहे. आम्ही दोन्ही संघांना शुभेच्छा देतो.