नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा सोमवार अर्थात २५ डिसेंबरपासून नवी मुंबईत सुरू होत आहे. स्पर्धेचे आयोजन नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने केले आहे. स्पर्धेत एकूण १७ देशांतील ६१ महिला टेनिसपटू सहभागी होणार आहेत. जपानची १९६ रँकिंग असलेली टेनिसपटू मोयुका उचीजीमा ही नामवंत खेळाडू सहभागी होणार आहे.
स्पर्धेत खेळलेल्या मुलींना ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेता येणार आहे. यापूर्वी खेळलेल्या महिला टेनिसपटूंनी ऑस्ट्रेलियन ओपन, ग्रँड स्लॅम, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धेत खेळणाऱ्या महिला टेनिसपटूंच्या गुणसंख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे त्यांना ग्रँड स्लॅम, ऑस्ट्रेलियन ओपन व ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला टेनिस खेळाडूंबरोबर नवी मुंबईतील आणि देशातील अन्य महिला खेळाडूंनाही स्पर्धेत स्थान दिले आहे.
उदयोन्मुख खेळाडूंना उत्तम संधीटेनिस विश्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेमुळे येथील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेनिस कोर्ट उपलब्ध झाले. नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन द्वारा आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेमुळे उदयोन्मुख खेळाडूंना उत्तम संधी प्राप्त झाली. स्पर्धेमुळे नवी मुंबई शहराचा लौकिक जागतिक स्तरावर पोहोचल्याचे मत आयटीएफ स्पर्धेचे संचालक तथा नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. दिलीप राणे यांनी व्यक्त केले.
गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटनया स्पर्धेचे उद्घाटन आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते येत्या २५ डिसेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी स्थानिक आमदार मंदा म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनतर्फे यापूर्वी फिफा स्पर्धेसाठी सराव मैदान तयार करण्यात आले होते. भारतातील बेस्ट फुटबॉल ट्रेनिंग ग्राउंड तयार केले म्हणून या मैदानाला गौरवण्यात आल्याचे डॉ. दिलीप राणे यांनी सांगितले.