नवी दिल्ली : भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस याने पूरव राजाच्या सोबतीने खेळताना जेम्स कारेतानी-जॉन पॅट्रिक यांचा पराभव करताना नोक्साविले चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेचे जेतेपद उंचावले. विशेष म्हणजे पेस-राजा या जोडीचे हे पहिलेच जेतेपद ठरले.स्पर्धेत अव्वल मानांकन लाभलेल्या पेस-राजा जोडीने अपेक्षित कामगिरी करताना सुरुवातीपासून राखलेला धडाका अंतिम फेरीपर्यंत कायम राखताना जेतेपदाला गवसणी घातली. चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पेस-राजा यांनी ७-६, ७-६ अशी बाजी मारत कारेतानी-पॅट्रिक यांचे कडवे आव्हान परतावले.यंदाच्या वर्षी आॅगस्ट महिन्यात पेस-राजा यांनी एकत्र आल्यानंतर आपले पहिले जेतेपद उंचावले. यंदाच्या मोसमात पेसने चौथे चॅलेंजर विजेतेपद पटकावले असून, त्याने लिओन व इकले येथे कॅनडाच्या आदिल शम्सुद्दिनसह, तर टालाहासी येथे अमेरिकेच्या स्कॉट लिपस्कीसह बाजी मारली होती. दुसरीकडे, राजानेही यंदाच्या सत्रात आपली छाप पाडली आहे. त्याने दिविज शरणसह खेळताना बोर्डो चॅलेंजर जिंकले होते. तसेच चेन्नई ओपन स्पर्धेतही त्याने शरणसह अंतिम फेरी गाठली होती.
नोक्साविले चँलेंजर : पेस-राजा यांनी मारली बाजी, पहिले जेतेपद पटकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:38 AM