- उदय बिनीवाले (थेट मेलबर्नहून)ट्रामचा दरवाजा उघडल्यानंतर दहा पावले चालले की अक्षरश: थेट प्रवेश टेनिस स्टेडियममध्येच. अतिशय आश्चर्यकारक, उत्कृष्ट सुविधा आहे मेलबर्न पार्क टेनिस स्टेडियममध्ये. कल्पना करा किती ज्येष्ठ, वयस्कर नागरिक आशीर्वाद देत असणार आयोजकांना. टेनिस सामने पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून येण्यासाठी ट्राम सेवा मोफत असून ट्राम स्थानकही अगदी दारातच आहे. अजून काय पाहिजे?आता स्पर्धेच्या वातावरणाचा नूर थोडा बदलल्याचे जाणवतेय. उप-उपांत्य सामन्यांपासून तिकीट दर गगनाला भिडतायत. आता रॉड लेव्हर अरेना या मुख्य कोर्टसाठी तिकिट्स संपल्याचे समजले. त्यामुळे चांगली आर्थिक स्थिती असलेले मध्यम आणि ज्येष्ठ प्रेक्षक जास्त संख्येने दिसत आहेत. स्टेडियम परिसरात वायफाय सेवा सर्वांसाठी मोफत आहे, शिवाय मोबाइल चार्जिंगसाठी ठिकठिकाणी सॉकेट्सही आहेत. अनेक वॉटर कुलर्स असलेल्या या परिसरात सर्व प्रकारच्या खाद्यपेयांची चंगळ आहे.डीजे, करमणुकीचे स्टॉल्स, भलेमोठे स्क्रीन्स, लाइव्ह वेस्टर्न साँग यावर तरुणाई, टेनिससह नाचगाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. खेळाडूंचे समर्थक त्या-त्या देशाच्या ध्वजानुसार फॅशन करून उत्साहात आले असून इथे वेगवेगळे आकर्षक पोशाख, केशरचना आणि स्टाइल्स याचे जणू प्रदर्शनच भरले असल्याचा भास होतो.थोडक्यात आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस हा १० दिवसांचा महोत्सवच साजरा होतोय, असे म्हणायला हरकत नाही. बुधवारी रात्री उशिरा बलाढ्य राफेल नदालला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत व्हावे लागले. त्या धक्क्यातून अजूनही काही कडवे समर्थक सावरलेले नाहीत. आता पराकोटीची उत्सुकता आहे ती अंतिम फेरीची.
परिपूर्ण संस्मरणीय असे मेलबर्न पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 5:39 AM