अकापुल्को (मेक्सिको) : दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन आणि स्पेनच्या डेव्हीड फेरर या नामांकीत खेळाडूंनी अपेक्षित कामगिरी करताना मेक्सिको ओपन एटीपी टेनिस स्पर्धेत विजयी आगेकूच केली. त्याचवेळी अमेरिकेच्या आठव्या मानांकीत जॉन इस्नरला आपल्याच देशाच्या रायन हॅरिसनविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागल्याने स्पर्धेत खळबळ माजली.केविनने एकतर्फी झालेल्या सामन्यात सहजा बाजी मारताना मोल्डोवाच्या राडू अल्बोट याचा केवळ एक तास २६ मिनिटांमध्ये ६-४, ६-३ असा धुव्वा उडवला.त्याचप्रमाणे स्पेनच्या डेव्हिड फेरर यानेही सहज आगेकूच करताना रशियाच्या अँडेÑ रुब्लेव याचा ६-४, ६-३ असा पराभव केला. उत्कृष्ट नियंत्रण राखताना फेररने १ तास २३ मिनिटांमध्ये बाजी मारत विजयी आगेकूच केली.दुसरीकडे, मात्र अत्यंत चुरशीच्या झालेल्या अमेरिकन खेळाडूंच्या लढतीत रायन हॅरिसनने अनपेक्षित निकालाची नोंद केली. त्याने स्पर्धेत आठवे मानांकन मिळालेल्या जॉन इस्नरला धक्का देत स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधले. पहिला सेट सहजपणे जिंकून आश्चर्यकारक आघाडी घेतलेल्या रायनला दुसºया सेटमध्ये इस्नरकडून अपेक्षित कडवी लढत मिळाली. यावेळी इस्नरकडून पुनरागमाची अपेक्षा होती. परंतु, टायब्रेकमध्ये मोक्याच्यावेळी खेळ उंचावत रायनने अखेर ६-३, ७-६(५) अशी बाजी मारुन आगेकूच केली. (वृत्तसंस्था)पहिल्या सेटमध्ये थोडाफार चुरशीचा खेळ झाल्यानंतर दुस-या सेटमध्ये केविनने आक्रमक खेळ करताना अल्बोटला पुनरागमनाची संधी दिली नाही.
मेक्सिको ओपन : अँडरसन, फेरर यांची विजयी आगेकूच ; रायन हॅरिसनचा धक्कादायक विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:58 AM