- उदय बिनीवालेसिडनी : चकचकीत झळाळणारा, एटीपी चषक उंचावून दिग्गज टेनिसपटू केन रोझलवाल यांनी सोमवारी सकाळी सिडनी आॅलिम्पिक पार्कमधील आधुनिक टेनिस स्टेडियमचे औपचारिक उद्घाटन केले.पहिली जागतिक सांघिक टेनिस स्पर्धा आॅस्ट्रेलियात ३ ते १२ जानेवारी २०२० दरम्यान खेळली जाणार आहे . सिडनी, पर्थ आणि ब्रिस्बेन येथे २४ देशांच्या खेळाडूंचे गट सामने होतील. त्याच वेळी, उपउपांत्य फेरीपासून अंतिम सामने सिडनी येथे होतील. या पार्श्वभूमीवर सिडनी आॅलिम्पिक पार्क येथील टेनिस स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन करण्यात आले.सुमारे ५०.५ दशलक्ष डॉलर्स खर्च करून एक वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. विशेष म्हणजे सर्व हवामान आणि वातावरणात सामने पूर्ण व्हावेत आणि टेनिस चाहत्यांना खेळाचा पूर्ण आनंद घेता यावा, या उद्देशाने विशेष प्रकारचे पिटीएफइ फॅब्रिक छत या स्टेडियमवर बसविण्यात आले आहे. त्यामुळे आता येथे सामन्यांसह सांस्कृतिक कार्यक्रम, विनाअडथळा पार पडतील.आॅस्ट्रेलियाचे महान खेळाडू केन रोझवाल (८ ग्रँडस्लॅम आणि २३ आंतरराष्ट्रीय स्पर्धा विजेते) यांच्या हस्ते हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बल्गेरिया टेनिस संघाचा कर्णधार ग्रिगोर दिमित्रोव, बेल्जियमचा डेव्हिड गॉफिन, क्रोशियाचा बोर्ना कोरिक आणि ब्रिटनचा जेमी मरे उपस्थित राहिल्याने या सोहळ्यात रंग भरले गेले.या समारंभादरम्यान येथील मंत्री जीओफ ली आणि टेनिस संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारीही उपस्थित होते. अत्याधुनिक गुणफलक, आरामदायी खुर्च्या व अन्य सुविधा यामुळे हे जागतिक दर्जाचे टेनिस स्टेडियम लक्षवेधी क्रीडा केंद्र म्हणून ओळखले जाईल .स्पर्धेचे स्वरूप : या स्पर्धेत जेतेपदासाठी २४ देशांचे खेळाडू एकमेकांविरुद्ध भिडतील. एकूण २२ दशलक्ष डॉलर्स रकमेची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेत ७५० एकेरी आणि २५० दुहेरी सामने खेळले जातील. सहा गटांमध्ये विभागणी करण्यात आलेल्या या स्पर्धेत राऊंड रॉबिन पद्धतीने सामने खेळविण्यात येतील. प्रत्येक गटातील विजेते आणि सर्वोत्तम २ उपविजेते संघ उपउपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
आधुनिक टेनिस स्टेडियमचे अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 2:06 AM