नवी दिल्ली : सध्याच्या घडीला भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा गर्भवती आहे. महिन्याभरात सानियाला बाळ होणार आहे. त्यामुळे याबद्दल लोकांच्या मनात बरेच प्रश्न आणि कुतुहलदेखील आहे. सानिया भारताची, तर तिचा पती शोएब मलिक हा पाकिस्तानचा, त्यामुळे तिच्या बाळाला कोणत्या देशाचं नागरिकत्त्व मिळू शकतं, यावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या प्रश्नावर सानियाने उत्तरही दिले आहे. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध सुधारावेत, म्हणून मी हे लग्न केलेलं नाही, असं खळबळजनक विधानही तिने यावेळी केलं आहे.
सानिया सध्या आठ महिन्यांची गर्भवती आहे. काही दिवसांपूर्वी तिने एक फोटोशूट केले होते. त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. आता तिच्या या बाळाबद्दल बरेच प्रश्न विचारले जात आहे आणि सानियानेही या प्रश्नांना उत्तर दिले आहे. तिचं बाळ कोणत्या देशाचा नागरिक असेल, असे विचारल्यावर सानिया म्हणाली की, " माझ्या बाळाला कोणत्या देशाचं नागरिकत्व द्यायचं, याचा विचार आम्ही आत्ता केलेला नाही. पण याविषयावर मी आणि शोएब काही दिवसांत निर्णय घेऊ. कदाचित माझ्या बाळाला भारत किंवा पाकिस्तान यापेक्षा तिसऱ्या देशाचेही नागरिकत्त्व मिळू शकते. "
माझ्या बाळाने डॉक्टर व्हावंमाझं बाळ क्रिकेटपटू होणार की टेनिसपटू, यावरही बरेच प्रश्न विचारले जात आहेत. मला वाटतं हे ठरवण्यासाठी अजून बराच कालावधी आहे. माझ बाळ कदाचित खेळाडूदेखील होणार नाही. पण मला असं वाटतं की माझ्या बाळाने डॉक्टर व्हावं आणि लोकांची सेवा करावी, असे सानिया म्हणाली.