माद्रिद : जगातील नंबर वन टेनिसपटू स्पेनचा राफेल नदाल याने क्ले कोर्टवर सलग ५० सेट जिंकून जॉन मॅकेन्रो याचा ३४ वर्षे जुना विक्रम मोडित काढला.माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत नदालने हा विक्रम नोंदविताना दिएगो श्वार्त्झमन याच्यावर ६-३,६-४ ने विजय नोंदविला.मॅकेन्रोने १९८४ साली सलग ४९ सेट जिंकले होते. त्यात माद्रिद ओपनच्या जेतेपदाचा देखील समावेश होता. नदाल आता आॅस्ट्रियाचा डोमिनिक थियेमविरुद्ध उपांत्यपूर्व सामना खेळणार आहे.१९८४ पासून हा विक्रम मॅकेन्रोच्या नावावर होता आणि त्याच्या सलग ४९ सेट विजयांमध्ये माद्रिद इनडोअर ओपनच्या विजेतेपदाचाही समावेश होता.नदालच्या सलग ५० सेट विजयांमध्ये बार्सिलोना, माँटे कार्लो आणि गेल्या वर्षीच्या फ्रेंच ओपन अजिंक्यपदाचा समावेश आहे. माद्रिद येथील स्पर्धा तो सहाव्यांदा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे.३१ वर्षीय नदाल या विक्रमाबद्दल म्हणाला की जेव्हा मीनिवृत्त झालेला असेल तेंव्हा माझ्या असल्या विक्रमांच्या नोंदीच कायम असतील. सलग ५० सेट जिंकणे अतिशय अवघड आहे म्हणून हा एक मोठा विक्रम आहे आणि तो मी केलाय. परंतु आता त्यात अधिक रमण्यापेक्षा आपल्या पुढच्या सामन्यावर मला लक्ष केंद्रित करायला हवे.
नदालने मोडला मॅकेन्रोचा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 6:52 AM