- उदय बिनिवाले (थेट मेलबर्नहून)जगातील सर्वोत्तम महिला, पुरुष, अनुभवी व युवा खेळाडू यांचा खेळ पाहणे यासारखे सुख नाही. ही स्पर्धा अत्यंत नेटकेपणाने आयोजित केल्याबद्दल आॅस्ट्रेलियाच्या टेनिस संघटनेचे अभिनंदन करावेच लागेल .आॅस्ट्रेलियात सध्या जंगलाला लागलेल्या आगीमुळे अनेक ठिकाणची टेनिसची मैदाने बाधीत झाली आहेत. काही ठिकाणच्या सुविधांना त्याची झळ पोहचली आहे. या सगळ्यांची डागडूजी करण्यासाठी आॅस्ट्रेलियन टेनिस संघटनेने १० लाख डॉलर्सचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. हे अत्यंत तातडीने उचललेले स्तुत्य पाऊल आहे. खेळावर असलेल्या प्रेमामुळे आगीमुळे बाधित झालेल्यांसाठी खेळाडू व क्रीडा संघटनांच्या माध्यमातून सुमारे ६० लाख डॉलर्सचा निधी जमा झाला आहे.आज , येथे राफेल नदालचा खेळ पाहण्यासाठी बंगलोरहून ६७ वर्षांचे गुड्डाण्णा आले होते. मेलबोर्नच्या तळपत्या उन्हातही नदालचा सराव पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसत होते. नदालबद्दल खूपच उत्साहाने ते बोलत होते. ते म्हणाले ‘डावखुरा नदाल माझा अतिशय आवडता असून तो जबरदस्त खेळाडू आहे, पण तरीही फेडररला तोड नाही. ...तो सर्वकालीन महान खेळाडू आहे.’ते म्हणाले, ‘ क्रिकेट आणि टेनिस हे दोन्ही खेळ माझ्यासाठी दोन डोळ्यांसारखे आहेत. बेंगलोर, मेलबोर्न व अन्य ठिकाणी मी अनेक सामने पाहिले आहेत. अगदी सुनील गावसकर, कपिलदेव यांच्यापासून विराट कोहली आणि रॉड लेव्हर, मागार्रेट कोर्ट ते जोकोविच, नदाल, फेडरर, बार्टी आदी सगळ्यांपर्यंत.’ टेनिस व क्रिकेटवर सारखेच प्रेम करणाºया या क्रीडाप्रेमीला माझा सलाम!
नदाल जबरदस्त... पण फेडरर महान खेळाडू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 5:56 AM