सर्बियन टेनिसपटूनोव्हाक जोकोव्हिचने अंतिम फेरीत डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून चौथ्यांदा यूएस ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. नोव्हाक जोकोव्हिचचे हे विक्रमी २४ वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. नोव्हाक जोकोव्हिचने यापूर्वी २०११, २०१५ आणि २०१८ मध्ये यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.
या सामन्यात नोव्हाक जोकोव्हिचने पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. पुढील सेटमध्ये डॅनिल मेदवेदेवने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण टायब्रेकरमध्ये नोव्हाक जोकोव्हिचने आपली ताकद दाखवली आणि हा सेटही ७-६(५) ने जिंकला. यानंतर तिसऱ्या सेटमध्ये नोव्हाक जोकोव्हिच पूर्ण फॉर्ममध्ये दिसला. तर तिसरा सेट ६-३ असा जिंकून नोव्हाक जोकोव्हिच यूएस ओपन चॅम्पियन बनला.
यूएस ओपन चॅम्पियन बनल्यानंतर नोव्हाक जोकोव्हिचला बक्षीस म्हणून सुमारे २५ कोटी रुपये मिळतील. दरम्यान, नोव्हाक जोकोव्हिचला २०२१ च्या यूएस ओपनच्या अंतिम फेरीत डॅनिल मेदवेदेवकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र आता नोव्हाक जोकोव्हिचने या पराभवाचा बदला घेतला आहे. तसेच, नोव्हाक जोकोव्हिचने आता अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला (२३) मागे टाकले आहे आणि सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाची माजी टेनिसपटू मार्गारेट कोर्टची बरोबरी केली आहे. राफेल नदालने २२ ग्रँडस्लॅम तर रॉजर फेडररने २० ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत.
यूएस ओपन फायनल जिंकल्यानंतर नोव्हाक जोकोव्हिच म्हणाला की, "या खेळात इतिहास रचणे खरोखरच खास आहे. मी येथे २४ ग्रँड स्लॅमबद्दल बोलेन असे कधीच वाटले नव्हते. हे वास्तव असेल असे मला कधीच वाटले नव्हते, पण गेल्या काही वर्षांमध्ये मला असे वाटले की मला एक संधी मिळाली आहे आणि जर ती होती तर ती का नाही मिळवली आणि आज ते घडले." दरम्यान, ३६ वर्षीय नोव्हाक जोकोव्हिचच्या व्यावसायिक टेनिस कारकिर्दीतील हे ३६ वे मोठे एकेरी विजेतेपद आहे.