बेलग्रेड : जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला सर्बियाचा टेनिसपटू आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वीच सहावे विम्बल्डन जिंकलेल्या जोकोविचने सांगितले की, ‘मी सर्बियाकडून टोकियो ऑलिम्पिक खेळणार असून यासह माझे ‘गोल्डन स्लॅम’चे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.’ जोकोविचने ट्वीटरद्वारे ही माहिती दिली. त्याने टोकियोचे तिकीट मिळवले असून ऑलिम्पिकमध्ये सर्बियासाठी खेळणे अभिमानाची बाब असल्याचे त्याने म्हटले.
जोकोविचने गेल्याच रविवारी सहाव्यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकताना कारकिर्दीतील विक्रमी २० वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. जर जोकोविचने ऑलिम्पिक सुवर्ण पदकासह पुढील यूएस ओपन स्पर्धाही जिंकली, तर त्याला ‘गोल्डन स्लॅम’ पूर्ण करण्यात यश येईल. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा तो पहिला पुरुष टेनिसपटू बनेल. एकाच वर्षी चार ग्रँडस्लॅम आणि ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकल्यास अशा कामगिरीला ‘गोल्डन स्लॅम’ म्हटले जाते.
टेनिस विश्वात असा पराक्रम आतापर्यंत केवळ दिग्गज स्टेफी ग्राफ हिलाच करता आला आहे. तिने १९९८ साली चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकतानाच ऑलिम्पिक सुवर्ण पदकही जिंकले होते.