मेलबोर्न : जपानची नाओमी ओसाकाने शनिवारी येथे महिला एकेरीच्या फायनलमध्ये जेनिफर ब्रॅडीचा सरळ सेट्समध्ये पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले. हे तिचे चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. ओसाकाने आठव्यांदा ग्रँडस्लॅम खेळताना चौथ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. तिने फायनलमध्ये सलग सहा गेम जिंकत ६-४, ६-३ ने विजय मिळवला. आपल्या मजबूत सर्व्हिसने सहा एस लगावत फायनलचा स्कोअर ४-० असा केला. मोनिका सेलेसने ३० वर्षांपूर्वी अशाप्रकारे आपली कारकीर्द सुरू केल्यानंतर अशी कामगिरी करणारी ओसाका पहिली महिला खेळाडू आहे.
ओसाकाने गेल्या वर्षी अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावले होते. तिने २०१८ मध्ये अमेरिकन ओपन व २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले होते. २३ वर्षीय ओसाकाचा जन्म जपानमध्ये झाला, पण ती तीन वर्षांची असताना तिचे कुटुंबीय अमेरिकेमध्ये स्थायिक झाले.
दरम्यान, २५ वर्षीय अमेरिकन खेळाडू ब्रॅडी आपली पहिली ग्रँडस्लॅम फायनल खेळत होती. ज्यावेळी जानेवारीमध्ये ती ऑस्ट्रेलियात आली त्यावेळी विमानात कुणी कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळल्यामुळे तिला १५ दिवस कडक विलगीकरणात रहावे लागले. स्टेडियममध्ये जवळजवळ ७,५०० प्रेक्षकांना प्रवेशाची परवानगी देण्यात आली होती.
केवळ दोन सक्रिय महिला खेळाडूंनी ओसाकापेक्षा अधिक ग्रँडस्लॅम जिंकले आहे. त्यात सेरेना (२३) व व्हीनस विलियम्स (७) यांचा समावेश आहे. आता ओसाकापुढे पुढील लक्ष्य क्ले व हिरवळीवर आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याचे राहील. कारण फ्रेंच ओपन व विम्बल्डनमध्ये तिला तिसऱ्या फेरीच्या पुढे मजल मारता आलेली नाही.