स्पेनच्या राफेल नदालनं ( Rafael Nadal) ने रविवारी फ्रेंच ओपन ( French Open) टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचवर ६-०, ६-२, ७-५ असा विजय मिळवून जेतेपद पटकावले. नदालचे हे २० वे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले. यासह त्यानं सर्वाधिक २० ग्रँड स्लॅम नावावर असलेल्या दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याच्या विक्रमाशी बरोबरी केली. नदालनं पहिले दोन सेट सहज जिंकल्यानंतर तिसरा सेटही सोपा जाईल, असे वाटले होते. पण, जोकोव्हिचनं कडवी झुंज दिली. राफेलचे हे १३वे फ्रेंच ओपन स्पर्धेतील जेतेपद आहे.
१३ वर्षांपूर्वी ऑक्टोबर २००७ मध्ये नदालच्या खात्यात ३ ग्रँड स्लॅम जेतेपदं होती आणि तेव्हा फेडररने १३ ग्रँड स्लॅम जिंकली होती. त्यावेळी तो कधी फेडररच्या विक्रमाशी बरोबरी करतील, असे म्हटले असते तर हसू आवरले नसते. पण, आज राफेलनं २०२०मध्ये २० ग्रँड स्लॅम जिंकून सर्वाधिक विजेतेपद पटकावणाऱ्या खेळाडूंमध्ये संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले.
जागतिक क्रमवारीत नोव्हाक अव्वल, तर नदाल दुसऱ्या स्थानावर आहे. या विजयासह नदालनं फ्रेंच ओपनमध्ये शंभरावा विजयाची नोंद केली. या स्पर्धेतील त्याच्या जय पराजयाची आकडेवारी ही १००-२ अशी आहे. यापैकीस २६-० असे विजय हे उपांत्य फेरी व अंतिम फेरीतील आहेत. पॅरिसमधले त्याचे हे सलग चौथे जेतेपद आहे. यापूर्वी नदालनं २००५-०८ या कालावधीत सलग चार वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. २०१०-१४मध्ये त्यानं पाच जेतेपद उंचावली. त्यासह त्यानं या कालावधीत चार अमेरिकन ओपन, दोन विम्बल्डन आणि एक ऑस्ट्रेलियान ओपन जिंकले.