ललित झांबरे/न्यूयॉर्क, दि. 9 - स्पेनच्या आग्रमानांकित राफेल नदालने धडाकेबाज विजयासह यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत राफेलने अर्जेंटिनाच्या 24 व्या मानांकित युआन मार्टिन डेल पोत्रोवर 4-6, 6-0, 6-3, 6-2 असा विजय मिळवला. यूएस ओपन विजेतेपदासाठी आता रविवारी नदालचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनशी होणार आहे.
डेल पोत्रोनं उपांत्यपूर्व फेरीत रॉजर फेडररला मात दिली होती आणि यापूर्वी 2009 मध्येही त्याने नदाल व फेडरर यांना लागोपाठच्या सामन्यात हरवून यूएस ओपनचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे या लढतीत डेल पोत्रोकडून जबरदस्त संघर्षाची अपेक्षा होती. परंतु राफेल नदालने पहिला सेट वगळता त्याला संधीच दिली नाही आणि2009 मधील उपांत्य फेरीतील पराभवाचे पुरेपूर उट्टे काढले. डेल पोत्रोनं पहिला सेट 50 मिनिटांत 6-4 असा जिंकला, परंतु त्यानंतर नदालने विलक्षण मुसंडी मारत पिछाडीवरुन आघाडी मिळत विजयाला गवसणी घातली. दुसऱ्या सेटमध्ये तर अवघ्या 27 मिनिटांत त्याने डेल पोत्रोचा 6-0 असा धुव्वा उडवला. या सेटमध्ये त्याने लागोपाठ तीनवेळा डेल पोत्रोची सर्विस भेदली.
या धडाक्यानंतर तिसरा सेट 43 मिनिटे रंगला परंतु यातही दुसऱ्या गेममध्ये मिळालेल्या ब्रेकने नदालला वरचष्मा मिळवून दिला जो त्याने शेवटपर्यंत टिकवून ठेवला. नदालने अर्ध्या तासात गुंडाळलेल्या चौथ्या सेटमध्ये दोन वेळा ब्रेकसह 4-1 अशी आघाडी घेतली तेव्हाच त्याचा विजय निश्चित झाला होता. नंतर हाताशी दोन मॅच पॉईंट असताना त्याने डाऊन द लाईन बॅकहँड विनर लगावून विजयावर शिक्कामोर्तब केले. नदालने यापूर्वी 2010 व 2013 मध्ये ही स्पर्धा जिंकली असून यंदा ऑस्ट्रेलियन व फ्रेंच ओपन पाठोपाठ तो तिसऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. राफाने ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही 23वी वेळ आहे.