22 वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पिअन राहिलेल्या राफेल नदालला फ्रेंच ओपनच्या पहिल्या टप्प्यात १४ वेळच्या चॅम्पिअन अलेक्झांडर ज्वेरेवकडून दारुण पराभव पत्करावा लागला आहे. जगातील चौथ्या नंबरच्या खेळाडूने नदालला 6-3, 7-6 (7/5), 6-3 अशा तीन सरळ सेटमध्ये धूळ चारली आहे.
२००५ मध्ये ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर रोलांड गॅरोसमध्ये झालेल्या ११६ सामन्यांमध्ये नदालची ही चौथी हार आहे. तर पॅरिसमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात नदालचा हा पहिलाच पराभव आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे नदालचा हा क्ले कोर्टावरील सलग दुसरा पराभव आहे.
नदालला अखेरचे खेळताना पाहण्यासाठी मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. जवळपास १५ हजार लोक हा सामना पाहण्यासाठी आले होते. तीन तास हा सामना चालला. यापैकी बहुतांशी वेळ ज्वेरेवने वर्चस्व गाजविले. सामन्यात परतण्यासाठी नदाल खूप संघर्ष करत होता. यावेळी त्याने त्याचे प्राबल्य असलेले फटके मारले. प्रेक्षकांनीही त्याच्या खेळाला चांगली दाद दिली. कदाचित हा नदालचा शेवटचा सामना ठरण्याची शक्यता आहे. नदालनेही याचे संकेत दिले आहेत.
तुमच्या सर्वांसमोर ही शेवटची वेळ असेल की नाही माहीत नाही. मला खात्री नाही. पण जर हा शेवटचा सामना असेल तर मी त्याचा आनंद घेतला आहे. आज माझ्या मनातल्या भावना शब्दात व्यक्त करणे कठीण आहे, अशा शब्दांत नदालने आपल्या भावना व्यक्त केल्या. 22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नदाल 3 जून रोजी 38 वर्षांचा होईल. नदाल हा जानेवारी २०२३ पासून हिप आणि पोटाच्या दुखापतीने त्रस्त आहे. यामुळे कदाचित लवकरच तो निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुखापतींमुळे त्याची क्रमवारी 275 व्या क्रमांकावर घसरली आणि फ्रेंच ओपनमध्ये तो प्रथमच बिगरमानांकित खेळाडू ठरला.
भारतालाही धक्का...भारताच्या सुमित नागलला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात रशियाच्या कॅरेन खाचानोव्हकडून सरळ सेटमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. खाचानोव्हच्या दमदार सर्व्हिस आणि धारदार फटक्यांमुळे नागल हैराण झाला होता. तिसऱ्या सेटमध्ये नागलने चांगला खेळ केला. परंतु पहिल्या दोन सेटमध्ये त्याला काहीच करता आले नव्हते. अखेर तिसरा सेटही खाचानोव्हने जिंकून नागलचा 2-6, 0-6, 6-7 (5-7) पराभव केला.