कोरोना व्हायरसमुळे जगभरातील परिस्थिती अजून बिघडत चालली आहे. या व्हायरसमुळे जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे रोंजदारी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना धान्य पुरवले जाईल, असे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात सरकारी यंत्रणाही अपूरी पडत आहे. अशा गरजूंसाठी क्रीडा विश्वातील अनेक मंडळींनी पुढाकार घेतला आहे. त्यात आणखी एका दिग्गजाचे नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे टेनिससम्रातरॉजर फेडरर... पण, फेडररसह त्याची पत्नीही मदतीसाठी पुढे आली आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात 4 लाख 71,820 लोकं संक्रमित झाले आहेत. त्यापैकी 21, 297 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1 लाख 14,703 लोकं बरी झाली आहेत. या परिस्थितीमुळे अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या जेवणाचे हाल झाले आहे. अशा लोकांसाठी फेडरर आणि त्याची पत्नी मिर्का यांनी 7 कोटींची मदत जाहीर केली. स्वित्झर्लंडमधील गरजूंना ही मदत पुरवली जाईल.
फेडररनं सोशल मीडियावर लिहीलं की,''प्रत्येकासाठी ही आव्हानात्मक परिस्थिती आहे आणि कोणीही त्यातून वाचू शकत नाही. मिर्का आणि मी स्वित्झर्लंडमधील गरजूंसाठी एक मिलियन स्वीस फ्रान्स ( 7 कोटी रुपये) देण्याचा निर्णय घेतला आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. गरजु कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आणखी अनेक जण पुढे येतील, अशी आशा आहे. एकत्र येऊन आपण या परस्थितीवर मात करू शकतो. सुरक्षित राहा.''