मुंबई - जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानांवर असलेले राफेल नदाल आणि रॉजर फेडरर या मॉडर्न एरातील दोन दिग्गज टेनिसपटूंनी विक्रमांची नवी उंची गाठली आहे. ATP रँकिंगमध्ये या दोघांनी नोंदवलेला विक्रम सहजासहजी मोडणे कोणालाही शक्य नाही. फेडररने ७५० आठवडे क्रमवारीत अव्वल पाच खेळाडूंत आपले स्थान कायम राखले. यासह त्याने महान टेनिसपटू जिम्मी कोनोर्स ( ७०६ आठवडे) यांना पिछाडीवर टाकले. या विक्रमात नदाल ६३९ आठवड्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ७५० आठवडे अव्वल पाच खेळाडूंत स्थान कायम राखणारा फेडरर हा जवळपास ३०० आठवडे ATP रँकिंगमध्ये अव्वल स्थानी होता. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. त्याव्यतिरिक्त तो ४५० आठवडे दुसऱ्या स्थानी होता. त्याने नुकतीच रॉजर कप स्पर्धेतून माघार घेतली.
(रॉजर फेडररची 'रॉजर कप'मधून माघार)
नदालने पीट सॅम्प्रास यांचा अव्वल २५ मध्ये सर्वाधिक काळ राहण्याच्या विक्रमाला मागे टाकले. या विक्रमात ६९५ आठवड्यांसह तो सहाव्या स्थानी आहे. पहिल्या पाच जणांत आंद्रे आगासी (९१६), फेडरर (९१५), कोनोर्स (८६४), जॉन मॅक्इनरो (७६६) आणि इव्हान लेंडल (७६०) यांनी स्थान पटकावलेले आहे.नदालच्या खात्यात ८३१० गुण आहेत आणि रॉजर कप जिंकल्यास त्यात १५१० गुणांची भर पडेल. फेडररची गुणसंख्या ७०८० अशी आहे, परंतु रॉजर कपमधून माघार घेतल्यामुळे ती ५४८० पर्य घसरू शकते. त्यामुळे वर्षाच्या अखेरपर्यंत नदालच्या अव्वल स्थानाला धोका राहणार नाही.