लंडन : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच याने बुधवारी सरळ सेटमध्ये विजय नोंदवीत विम्बल्डनच्या सहाव्या जेतेपदाकडे कूच केली. जोकोने सेंटर कोर्टवर हंगेरीचा बिगर मानांकित मार्टन फुकसोविच याचा ६-३,६-४,६-४ असा पराभव करीत दहाव्यांदा स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. कुठल्याही ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याची त्याची ही ४१ वी वेळ आहे.
बोपन्ना-सानिया बाहेर
रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा या भारतीय जोडीचा मिश्र दुहेरीत पराभव झाल्याने यंदाच्या विम्बल्डनमधून भारताचे आव्हान संपुष्टात आले. तिसऱ्या फेरीतील या लढतीत रोहन-सानिया यांनी ज्युलियन रोजर आणि आंद्रेजा क्लेपाक या १४व्या मानांकीत जोडीला तीन सेटपर्यंत झुंजवले. मात्र, अखेर ज्युलियन-आंद्रेजा यांनी ६-३, ३-६, ११-९ अशी बाजी मारत चौथी फेरी गाठली.
हुर्काझकडून फेडरर पराभूत
विश्वविक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या प्रयत्नात असलेला स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला यंदाच्या विम्बल्डनमध्ये उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का बसला. पोलंडच्या हुबर्ट हुर्काझने सरळ तीन सेटमध्ये बाजी मारत तब्बल ८ वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलेल्या फेडररला ३-६,६-७ (४-७),०-६ असे पराभूत केले.