न्यूयॉर्क : भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपन्ना याने ऐतिहासिक कामगिरी करताना अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरी गटातून अंतिम फेरीत गाठली. ४३ वर्षीय बोपन्ना पुरुष दुहेरी ग्रँडस्लॅम अंतिम फेरीत पोहचणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडेनसह खेळताना विजयी कामगिरी केली.
बोपन्नाने (४३ वर्ष ६ महिने) नवा विश्वविक्रम नोंदवताना कॅनडाचा दिग्गज डॅनिएल नेस्टर (४३ वर्ष ४ महिने) याचा विक्रम मोडला. बोपन्ना-एबडेन यांनी पिएरे ह्युजेस हर्बर्ट आणि निकोलस माहुत या फ्रान्सच्या जोडीचा ७-६(७-३), ६-२ असा पराभव केला. विशेष म्हणजे ६ वर्षांनंतर बोपन्नाने पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. याआधी त्याने २०१७ मध्ये फ्रेंच ओपनमध्ये मिश्र दुहेरीत जेतेपद पटकावले होते. तसेच, त्याने तब्बल १३ वर्षांनी पुरुष दुहेरीच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
याआधी, २०१० मध्ये त्याने यूएस ओपनमध्येच उपविजेतेपदावर समाधान मानले होते. बोपन्नाने अद्याप पुरुष दुहेरीत एकही ग्रँडस्लॅम पटकावले नसून मिश्र दुहेरीत त्याने कॅनडाच्या गॅब्रिएला डाब्रोवस्कीसोबत फ्रेंच ओपन जेतेपद पटकावले होते. पहिलीच सर्विस गमावल्याने पिछाडीवर पडलेल्या बोपन्ना-एबडेन यांनी अप्रतिम पुनरागमन करत पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकला. यानंतर त्यांनी दुसऱ्या सेटमध्ये जबरदस्त आक्रमक खेळ करताना फ्रेंच जोडीला पुनरागमनाची एकही संधी न देता दिमाखात बाजी मारली.
अल्काराझ-मेदवेदेव भिडणार
स्पेनचा कार्लोस अल्काराझ आणि रशियाचा तिसरा मानांकित दानिल मेदवेदेव यांनी प्रचंड उडकाड्यावर मात करीत पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य सामन्यात दोघेही एकमेकांविरुद्ध खेळतील. गतविजेत्या अल्काराझने जर्मनीचा अलेक्झांडर ज्वेरेवचा ६-३, ६-२, ६-४ ने पराभव केला. रॉजर फेडरर याने २००४ ते २००८ पर्यंत सलग पाच वेळा येथे जेतेपदाचा मान मिळविला होता. तेव्हापासून पुरुष ऐकरीत कुठलाही खेळाडू जेतेपदाचा बचाव करू शकलेला नाही. मेदवेदेवने रशियाच्याच आंद्रे रुबलेवला ६-४, ६-३, ६-४ असे नमवले. महिलांमध्ये बेलारूसची आर्यना सबालेंकाने २३ वी मानांकित झेंग किनवेनचा ६-१, ६-४ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. दुसरीकडे, मेडिसन कीजने विम्बल्डन चॅम्पियन मार्केटा वोंद्रोसोवा हिचा ६-१, ६-४ असा पराभव केला.