नवी दिल्ली : ‘यूएस ओपनच्या अंतिम फेरीमध्ये स्पेनचा अव्वल खेळाडू राफेल नदालविरुद्ध पराभूत झाल्यानंतर रशियन टेनिसपटू डेनिल मेदवेदेवच्या विनम्रतेने प्रभावित केले,’ असे रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मेदवेदेवने सामन्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, ‘रशियन खेळाडूने आपल्या परिपक्वतेमुळे माझ्या हृदयात स्थान मिळवले.’‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले, ‘यूएस ओपन जिंकण्याची जेवढी चर्चा होती तेवढीच चर्चा डेनिल मेदवेदेवच्या भाषणाची होती. २३ वर्षीय मेदवेदेवची परिपक्वता प्रत्येकाला प्रभावित करणारी होती. या भाषणाच्या थोड्या वेळापूर्वीच तो १९ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता व दिग्गज टेनिसपटू राफेल नदालविरुद्ध अंतिम फेरीत पराभूत झाला होता.’पंतप्रधान म्हणाले, ‘अंतिम लढत गमाविल्यानंतर कुठलाही खेळाडू निराश होतो, पण मेदवेदेव निराश झाला नव्हता. यावेळी दुसरा कुठला खेळाडू असता तर निराश झाला असता, पण त्याचा चेहरा निराश नव्हता. त्याच्या भाषणाने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य परतले. त्याची विनम्रता व खिलाडूवृत्ती बघितल्यानंतर त्याने प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवले.’मेदवेदेवच्या खिलाडूवृत्तीची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले, ‘त्याच्या वक्तव्याचे तेथे उपस्थित प्रत्येक प्रेक्षकाने स्वागत केले. त्याने चॅम्पियन नदालचीही प्रशंसा केली. तो म्हणाला होता की, नदालने कशा प्रकारे लाखो युवांना टेनिस खेळण्यास प्रेरित केले. त्याच्याविरुद्ध खेळणे किती कठीण होते, असेही तो म्हणाला. कडव्या लढतीनंतर पराभव स्वीकारावा लागल्यावरही त्याने आपला प्रतिस्पर्धी नदालची प्रशंसा करत खिलाडूवृत्तीचा परिचय दिला.’ (वृत्तसंस्था)
रशियन टेनिसपटूने केले पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रभावित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 4:16 AM