मेलबर्न : बेलारूसच्या आर्यना सबालेंकाने तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात कझाकिस्तानच्या एलेना रिबाकिनाचे कडवे आव्हान परतवले. यासह सबालेंकाने कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. पहिला सेट गमावून पिछाडीवर पडलेल्या सबालेंकाने जबरदस्त पुनरागमन केले. तिने सलग दोन सेट जिंकत रिबाकिनाचे आव्हान ४-६, ६-३, ६-४ असे परतवले. विशेष म्हणजे सबालेंकाने सात डबल फॉल्ट केले, मात्र ५१ विनर्सपैकी १७ एस फटके मारत सबालेंकाने सामन्यावर वर्चस्व मिळवले. यंदाचे वर्ष सबालेंकासाठी जबरदस्त ठरले असून तिने सलग ११ सामने जिंकले आहेत. यादरम्यान तिने दोन जेतेपदही पटकावली आहेत. रिबाकिनाने स्पर्धेच्या चौथ्या फेरीत अव्वल मानांकित इगा स्वियातेकला नमवून खळबळ माजवली होती. त्यामुळे तिला अंतिम सामन्यात संभाव्य विजेती मानले जात होते. मात्र, तिला पहिला सेट जिंकून आघाडी घेतल्यानंतरही सबालेंकाचा धडाका रोखता आला नाही. आता दुसरे स्थानयाआधी सबालेंकाने तीन ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र, यावेळी तिने सर्व कसर भरून काढताना पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. या शानदार विजेतेपदासह सबालेंका आता जागतिक क्रमवरीत दुसऱ्या स्थानीही झेप घेईल.
Australian Open: सबालेंकाने जिंकले ऑस्ट्रेलियन ओपन, रिबाकिनाचे कडवे आव्हान परतवले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 6:05 AM