नवी दिल्ली-
भारताची महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने निवृत्तीची घोषणा केली आहे. १६ जानेवारीपासून सुरू होणारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सानियाची अखेरची स्पर्धा असणार आहे. सानियाची ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. याआधी सानियानं घोषणा केली होती की ती WTA 1000 दुबई टेनिस चॅम्पियनशीपनंतर निवृत्ती घेईल. जी १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पण आता तिनं 'ऑस्ट्रेलियन ओपन' स्पर्धाच आपल्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा असेल असं जाहीर केलं आहे.
निवृत्तीची घोषणा करताना सानियानं भावूक मनोगत व्यक्त केलं आहे. यात तिनं आपल्या आजवरच्या प्रवासाची माहिती देताना पाठिंबा दिलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. ऑस्ट्रेलियन ओपननंतर आपल्या मुलासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतित करण्याची इच्छा असल्याचं तिनं म्हटलं आहे. "३० वर्षांपूर्वी हैदराबादची एक सहा वर्षांची मुलगी टेनिस कोर्टवर पहिल्यांदा आपल्या आईसोबत गेली होती. त्यावेळी टेनिस कसं खेळतात हे माझ्या प्रशिक्षकांनी पहिल्यांदा समजावून सांगितलं होतं. टेनिस खेळण्यासाठी मी खूप लहान आहे असं त्यावेळी मला वाटलं होतं. माझ्या स्वप्नांची लढाई वयाच्या सहाव्या वर्षापासूनच सुरू झाली होती", असं सानियानं म्हटलं आहे.
सानिया म्हणते,"माझे आई-वडील, बहिण, कुटुंब, प्रशिक्षक, फिजिओसह माझ्या पाठिशी उभ्या असलेल्या संपूर्ण टीमविना आजवरचा प्रवास शक्य झालाच नसता. ही सर्व मंडळी माझ्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही काळात माझ्यासोबत उभी होती. मी यातील प्रत्येकासोबत आनंद, अश्रू, दु:ख सर्व शेअर केलं आहे. यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करू इच्छिते. तुम्ही सर्वांनी मला माझ्या कठीण काळात पाठिंबा दिला आहे. मला मदत केली आहे. हैदराबादच्या एका छोट्याशा मुलीला केवळ एक स्वप्न पाहण्याची नुसती हिंमत नव्हे, तर स्वप्न साकार करण्यासाठीची मदत देखील केली आहे"
सानियाची कामगिरीसानिया मिर्झानं टेनिस करिअरमध्ये कधी सिंगल ग्रँडस्लॅम जिंकलेलं नाही. पण डबल्समध्ये तिनं सहावेळा चॅम्पियनशीप मिळवली आहे. सानियानं डबल्समध्ये ज्या सहा ग्रँडस्लॅम जिंकल्यात त्यातील तीन महिला डबल्स आणि तीन मिक्स्ड डबल्स स्पर्धा जिंकल्या आहेत. सानियानं शेवटचं ग्रँडस्लॅम २०१६ साली ऑस्ट्रेलियन ओपनमध्येच महिला डबल्स किताब जिंकलं होतं. त्यावेळी सानिया आणि मार्टिना हिंगिस जोडीनं अंतिम सामन्यात अँड्रीया लावाकोवा आणि लूसी हराडेका यांना पराभूत केलं होतं.