हैदराबाद - भारताची दिग्गज टेनिसपटूसानिया मिर्झा हिने अलीकडे २०२२ च्या मोसमानंतर निवृत्त होण्याची घोषणा केली. ‘माझे शरीर आता थकू लागले. प्रेरणा आणि ऊर्जा यांचा स्तर कमी होत आहे. जखमा त्रस्त करू लागल्या. आई बनल्यानंतर काही मर्यादादेखील आल्या. त्यामुळे २०२२ चा हंगाम आपला अखेरचा हंगाम असेल, असा खुलासा एका मुलाखतीदरम्यान सानियाने केला.
सानिया म्हणाली, ‘टेनिस माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आयुष्याच्या अखेरपर्यंत तो कायम असेल. माझ्याकडे असलेल्या आठवणी आणि उपलब्धी यातच मी आनंदी आहे. वर्षभर शंभर टक्के योगदान देत मोसमाअखेर निवृत्त होण्याची योजना आहे. निवृत्त होण्याचा विचार अनेक महिन्यांपासून डोक्यात होता. याबाबत विचार करीत होते. मी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली तेव्हा पत्रकार देखील आश्चर्यचकित झाले. यावर मी म्हणाले, ‘मी ३५ वर्षांची आहे. तुम्हा सर्वांनी माझ्या निवृत्तीची अपेक्षा करायलाच हवी. ऑस्ट्रेलिया हे स्थळ माझ्यासाठी नेहमी आकर्षण राहिले. मी याच ठिकाणी सेरेनाविरुद्ध तिसऱ्या फेरीपर्यंत खेळले. हा एक योगायोग होता, जो ऑस्ट्रेलियात जुळून आला.’ आई बनल्यानंतर प्राधान्य बदलले.
सानिया पुढे म्हणाली, ‘मातृत्वानंतर शारीरिक बदल होतात. शरीर पूर्ववत स्थितीत येण्यास वेळ लागतो. माझ्यावर तीनवेळा मोठ्या शस्त्रक्रिया पार पडल्या. दोनदा गुडघ्यांवर आणि एकदा मनगटाची शस्त्रक्रिया करण्यात आली. माझ्या मर्जीप्रमाणे शरीर आता साथ देत नाही. माझी माझ्या शरीराकडून अधिक अपेक्षा असावी; पण असे घडत नाही. बाळ झाल्यानंतर आयुष्याच्या गरजा बदलतात. काही गोष्टींचा प्राधान्यक्रमदेखील बदलतो.’
माझ्या बाळाने मला खेळताना पाहिले, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान मानते. कोरोना सावटात बाळासोबत प्रवास करणे सोपे नाही. माझ्या निवृत्तीमागील हेदेखील मोठे कारण आहे.
सानियाने काही दिवसांआधी त्रस्त होऊन निवृत्तीची घोषणा फार लवकर केल्याचा पश्चात्ताप होतो, असे म्हटले होते. तिला प्रत्येकजण याविषयी विचारणा करीत होता. याविषयी निवृत्ती जाहीर करीत मी चूक तर केली नाही ना, असा उलट सवाल सानियाने स्वत:ला केला होता. सानिया मिश्र दुहेरीत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पराभूत झाल्यानंतर भारतात परतली.