मेलबर्न : सेरेना विल्यम्स आणि नाओमी ओसाका यांनी रविवारी येथे निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या लढतींमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. या दोघींनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष विभागात मात्र डोमिनिक थीमचे आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले.ऑस्ट्रेलियन ओपन २०२०चा उपविजेता आणि यूएस ओपन चॅम्पियन डोमिनिक थीमला ग्रिगोर दिमत्रोव्हविरुद्ध ६-४, ६-४, ६-० ने पराभव स्वीकारावा लागला.सेरेनाने सातव्या मानांकन प्राप्त आर्यना सबालेंका हिला ६-४,२-६, ६-४ असे पराभूत केले. सेरेना हिने आपल्या विक्रमी २४व्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाच्या आशा कायम राखल्या. तिने आपले अखेरचे ग्रॅण्डस्लॅम २०१७ मध्ये ऑस्ट्रेलिया ओपनमध्येच जिंकले होते. सेरेनाचा हा कोणत्याही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीतील ६२वा सामना होता, तर सबालेंका या फेरीतील केवळ दुसरा सामना खेळत होती. त्या दोघींमध्ये चांगलीच लढत रंगली होती. मात्र अखेरीस अनुभवी सेरेनाने विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत सेरेनाचा सामना सिमोना हालेप आणि इगा स्वितेक यांच्यातील विजेतीसोबत होणार आहे.त्याआधी नाओमी ओसाका हिने दोन मॅच पॉइंट वाचवत पुनरागमन केले आणि गर्बाईन मुगुरुजावर ४-६, ६-४, ७-५ने मात केली. तिने अखेरीस चार गेम जिंकत शानदार पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये २०१९ची विजेती ओसाका हिने अखेरच्या ५-३च्या स्कोअरवरून १५-४० अशी मागे होती. मुगुरूजाकडे दोन मॅच पॉइंट होते. मात्र त्याचा फायदा घेण्यात ती अपयशी ठरली. ओसाकाची लढत आता तैवानची ३५ वर्षांची सी सु वेईसोबत होणार आहे. बिगर मानांकित सी सु वेईने २०१९च्या फ्रेंच ओनपची फायनलिस्ट मार्केटा वांड्रोसोवाला ६-४, ६-२ असे पराभूत केले. तिने पहिल्यांदाच कोणत्याही ग्रॅण्डस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली आहे. ती ओपन युगात ग्रॅण्डस्लॅम उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारी सर्वात वयस्कर खेळाडू ठरली आहे.
- पुरुषांच्या गटात रशियाचा क्वालिफायर असलान करासेव याने २०व्या मानांकन प्राप्त फेलिक्स आगुर अलिसामीला३-६, १-६,६-३,६-३,६-४ असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. - १९९६ नंतर पहिल्यांदाच कोणत्याही खेळाडूने ग्रॅण्डस्लॅम पदार्पण करताना अंतिम आठमध्ये जागा बनवली. याआधी ॲलेक्स रादुलेस्कु यांनी १९९६च्या विम्बल्डन स्पर्धेत अशी कामगिरी केली होती.