लॉस एंजिलिस : ‘मागच्यावर्षी मी मुलीला जन्म दिला. बाळंतपणानंतर माझ्या फुफ्फुसाजवळ रक्त जमा झाले होते. जीवन मरणाच्या दारात मी हेलकावे खात होते. स्वत:चा मृत्यू डोळ्यापुढे पाहून मी पुरती हादरलेही...’’ टेनिससम्राज्ञी सेरेना विलियम्स हिने ही आपबिती एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितली. मुलगी आॅलिम्पिया हिला जन्म दिल्यानंतर सेरेनाच्या फुफ्फुसात रक्त जमा झाले होते. ती म्हणाली,‘ मुलीला जन्म दिल्यानंतर मी जवळपास संपलेच होते. प्रसूतीनंतर हृदयाचे ठोके मंद झाले होते. डॉक्टरांनी सिझेरियनचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियादेखील यशस्वी झाली. मी पूर्वस्थितीत आले तेव्हा माझ्या कुशीत एक गोंडस बाळ होते.’23 ग्रॅण्डस्लॅम विजेती असलेली सेरेना पुढे म्हणाली,‘आई बनल्यानंतर पुढील २४ तासांत जे संकट ओढवले त्यामुळे पुढील सहा दिवस सर्वांसाठी तणावपूर्ण ठरले. माझ्या फुफ्फुसातील आतड्यात रक्तस्त्रावामुळे लहान लहान गोळे बनले (ब्लड क्लॉट) होते.’ ३६ वर्षांच्या सेरेनाला रक्ताचे गोळे बनल्यामुळे मृत्यूचे भय वाटण्याची ही पहिली वेळ नव्हती. याआधी २०११ मध्ये म्यूनिचमधील हका रेस्टॉरेंटमध्ये ग्लास फुटून पायाला झालेल्या जखमेनंतर जवळपास वर्षभर फुफ्फुसातील रक्त पुरवठा मंद झाल्याचा त्रास सहन करावा लागला होता. जुना वैद्यकीय अहवाल बघता मुलीच्या जन्मानंतर मला चक्क मृत्यू डोळ्यापुढे दिसत होता. सिझेरियननंतर एक दिवस मला श्वसनाचा त्रास झाला. डॉक्टरांनी सिटी स्कॅन करीत मला व्हेंटिलेटर लावले होते. पण माझ्यामागचे विघ्न येथेच संपले नव्हते. मला सारखा खोकल्याचा त्रास सुरू होताच सिझेरियनच्या जागेवर विपरीत परिणाम व्हायला लागला होता. डॉक्टरांना माझ्या पोटावर लाल डाग आढळून आला. याचा विपरीत परिणाम फुफ्फुसावर होऊ नये यासाठी मला आॅपरेशन कक्षात ठेवण्यात आले. पण सुदैवाने पुढे काही झाले नाही. मी घरी परतले तेव्हा पुढील सहा आठवडे अंथरुणाला खिळून राहावे लागले.’सेरेनाने डॉक्टरांचे तोंडभरून कौतुक केले. डॉक्टरांनी सर्वस्व पणाला लावले नसते तर मी आज या जगात नसती, अशी प्रशंसा करणाºया सेरेनाने त्या इस्पितळाचा खुलासा मात्र केला नाही.
सेरेनाला दिसला डोळ्यांपुढे मृत्यू...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 3:44 AM