नवी दिल्ली : जागतिक क्रमवारीतील सहाव्या क्रमांकावरील मारिन सिलीच, यंदा अमेरिकन ओपन फायनलमध्ये धडक मारलेला केव्हिन अँडरसन आणि इवो कार्लोविच हे एक जानेवारीपासून पुणे येथे सुरू होणा-या पहिल्या एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेतील मुख्य आकर्षण असतील.या स्पर्धेत सिलीच (क्रोएशिया), जागतिक क्रमवारीतील १४ वा अँडरसन (दक्षिण आफ्रिका), २०१७ मध्ये चेन्नई ओपनचा विजेता ठरलेला रॉबर्टो बतिस्ता एगुट (स्पेन) आणि ४२ व्या मानांकित रॉबिन हास (नेदरलँड) यांचा एकेरीत समावेश आहे. याआधी ही स्पर्धा २१ वर्षे चेन्नईत आयोजित होत होती.महाराष्ट्र ओपनमध्ये येन-सून लू (७१ वा मानांकित), जेरेमी चार्डी (७७ वा मानांकित), पिएरे-ह्यूजेस हर्बर्ट (७१ वा) आणि जाईल्स सिमोन (९१ वा मानांकित) या अव्वल १०० मधील खेळाडूंचाही सहभाग असणार आहे.२०१४ सालचा अमेरिकन ओपन चॅम्पियन असलेला सिलीच याला यंदा चेन्नईत पहिल्या फेरीत सनसनाटी पराभवाचा सामना करावा लागला होता; परंतु या स्पर्धेत तो प्रबळ दावेदार म्हणून सुरुवात करेल. त्याने २००९ आणि २०१० मध्ये चेन्नई ओपन स्पर्धा जिंकली आहे. त्याचप्रमाणे, अर्जेंटिनाचा रोजेरियो दुत्रा सिल्वा काचानटून ओपन चॅलेंजर जिंकल्यानंतर येथे खेळत आहे. दरम्यान, एमएसएलटीए सचिव सुंदर अय्यर यांनी वाइल्ड कार्डविषयी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)
महाराष्ट्र ओपनमध्ये सिलीच खेळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 5:16 AM