मेलबोर्न - आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अमेरिकेच्या कोको वांदेवेघेच्या केळी हट्टाच्या चर्चा राहिली तर आज दुसऱ्या दिवशी बेलारूसच्या एरिना साबालेंकाच्या सामन्यादरम्यानच्या जोरदार आवाजाची चर्चा राहिली. ही १९ वर्षीय बेलारशियन खेळाडू आॅस्ट्रेलियाच्या अॅशली बार्टीकडून तीन सेटमध्ये पराभूत झाली परंतु तिच्या खेळापेक्षा प्रत्येक फटक्यावेळी ती करणाऱ्या जोरदार आवाजाचीच चर्चा राहिली. साबालेंकाच्या आवाजापायी प्रेक्षकही एवढे हैराण झाले की त्यांनी नंतर-नंतर तिच्या ओरडण्याचीच नक्कल करायला सुरूवात केली आणि पंचांना सामन्यादरम्यान शांतता राखण्याचे वारंवार आवाहन करावे लागले. साबालेंकाच्या हा आवाज ट्विटरवरही ट्रेंडिंग राहिला. बऱ्याच माजी टेनिसपटूंनी तिच्या आवाज करण्याच्या सवयीबद्दल कॉमेंट टाकल्या. पॅम श्रायव्हर म्हणाली की साबालेंका ३४७ प्रकाराचे वेगवेळे आवाज काढू शकते ही खरोखरच विलक्षण टॅलेंट आहे. टॉड वूडब्रिज म्हणाला की साबालेंका चांगली खेळाडू आहे पण तिच्या आवाजाबद्दल काहीतरी करायला हवे. रिच ग्रेगरी म्हणाला की नियमांत बदल करण्याची गरज आहे तर निक वेडच्या मते टेनिससाठी ही गोष्ट नवीन नसली तरी पंच किंवा अधिकारी त्याबद्दल खेळाडूंवर काहीच कारवाई का करत नाहीत? साबालेंकाचा आवाज अनावश्यक मोठा होता आणि सामना बघणे कठीण झाले होते.
या आवाजावरूनच एक प्रासंगिक विनोद झाला. तो असा की गतविजेता रॉजर फेडररच्या सहज विजयाच्या सामन्यादरम्यान मध्येच बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे रॉड लेव्हर कोर्टवर स्वत: फेडरर व प्रेक्षकांचे लक्ष विचलीत झाले. त्यावेळी फेडररने हजरजबाबीपणे ‘तो माझा आवाज नाही?’ असे म्हणताच तेथे हास्यकल्लोळ झाला.
स्टार महिला टेनिसपटू युजिनी बौचार्ड ही कॅनडाची असली तरी मेलबोर्नमध्ये म्हणजे आॅस्ट्रेलियात तिला खंदे समर्थक मिळाले आहेत. तिच्या साधारण डझनभर आॅस्ट्रेलियन समर्थकांनी जिनी आर्मी नावाचा तिचा समर्थक गटच बनवला आहे. दोन नंबरच्या कोर्टवर बौचार्ड विजयासाठी संघर्ष करत असताना जिनी आर्मीचे लाल पँट आणि पांढरे टी-शर्ट घातलेले सदस्य तिचा उत्साह वाढवत होते. यासाठी लोकप्रिय गाण्यांच्या चालीवर त्यांनीतिच्या नावाचा घोष चालवला होता.२०१४ पासून ही जिनी आर्मी तिचे समर्थन करत आली आहे आणि पुढच्या सामन्यावेळी त्यांना बौचार्डच्या समर्थनासाठी पूर्ण जोर लावावा लागणार आहे कारण तिचा पुढचा सामना नंबर वन सिमोना हालेपशी आहे.