मुंबई : जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने रविवारी सहाव्यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकताना कारकिर्दीतील एकूण २० वे ग्रँडस्लॅम पटकावले. यासह त्याने रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. या पराक्रमानंतर सोशल मीडियावर जोकोविचची कामगिरी तुफान व्हायरल झाली. मात्र, यामध्ये त्याचा एक फोटोही व्हायरल होत असून हा फोटो पाहून भारतीयांना सुखद धक्का बसत आहे. जोकोविचच्या घराच्या भिंतीवर कृष्णाचे चित्र दिसत असल्याने भारतीय चाहते भारावले असून जोकोविच खरंच कृष्ण भक्त आहे का? अशी चर्चा सध्या रंगत आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये जोकोविच आपल्या मुलांसोबत खेळताना दिसत आहे. मात्र, भारतीय चाहत्यांनी जोकोविचच्या मागच्या बाजूवरील भिंतीवर असलेले कृष्णाचे चित्र अचूक वेधले आणि हा फोटो आता प्रचंड व्हायरल होत आहे. काहींच्या मते विशिष्ट अॅप किंवा सॉफ्टवेअरच्या मदतीने ख-या फोटोमध्ये बदल करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. पण खरी गोष्ट म्हणजे, जोकोविचचा व्हायरल होत असलेला फोटो खरा असून यामध्ये कोणत्याही सॉफ्टवेअरच्या आधारे छेडछाड करण्यात आलेली नाही.
जोकोविचने २०१८ साली हा फोटो ट्वीटरवर पोस्ट केला होता. यामध्ये तो मुलांसोबत खेळताना दिसत असून भिंतीवर कृष्णलीला सुरु असलेले चित्र दिसत आहे. या फोटोला जोकोने ‘मुलांचे दिवस सुरु’ अशी कॅप्शन दिली आहे. मात्र हा फोटो सर्वप्रथम व्हायरल झाला होता २०१९ साली. त्यावेळी जोकोने फेडररला नमवून विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. आता पुन्हा एकदा हा फोटो व्हायरल होत असून भारतीय चाहते यामुळे सुखावले आहेत.
पण जोको खरंच कृष्णभक्त आहे का हे स्पष्ट झालेले नाही. २०१८ साली एका मुलाखतीमध्ये जोकोने योगा आणि मेडिटेशनमुळे खेळ उंचावण्यास मदत झाल्याचे जोकोने सांगितले होते. २०१४ साली जोकोविच डिसेंबरमध्ये इंटरनॅशनल प्रीमियर टेनिस लीगच्या (आयपीटीएल) निमित्ताने भारतात आला होता. त्यावेळी, भारतीयांचे प्रेम पाहून आपण भारावून गेलो, असे जोकोने म्हटले होते. यादरम्यानच त्याला हे चित्र भेट मिळाले असावे, असाही अंदाज भारतीय चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.