मुंबई, दि. 2- स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स आई झाली आहे. सेरेनाने मुलीला जन्म दिला आहे. 36 वर्षीय सेरेनाने शुक्रवारी मुलीला जन्म दिला. सेरेनाची मोठी बहीण व्हिनस विल्यम्स हिने युएस ओपनच्या तिसऱ्या फेरीचा सामना जिंकल्यावर सेरेनाला मुलगी झाल्याची माहिती दिली. मी अतिशय आनंदी आहे. मावशी झाल्याचा आनंद मला शब्दात सांगता येत नाही, असं व्हिनसने म्हंटलं आहे. तसंच युएस ओपन टेनिसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सेरेनाला शुभेच्छा देणारं ट्विट करण्यात आलं आहे.
सेरेना सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सेरेना नेहमीचं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून गरदोरपणाच्या दरम्यानचे फोटो अपडेट करायची. नुकतंच ती वॅनिटी फेअर मॅगझिनच्या कव्हर पेजवरही झळकली. सेरेनाचा बेबी बंम्प फ्लॉन्ट करणारा फोटो त्या मासिकाच्या कव्हर पेजवर होता.
जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनच्या दोन दिवस आधी सेरेनाला गरोदर असल्याचं समजलं होतं. त्यावेळी गरोदर असताना ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सेरेना सहभागी झाली. सेरेनाने ग्रँड स्लॅम जिंकून आपल्या चाहत्यांसह अवघ्या टेनिस जगताला आश्चर्याचा धक्का दिला होता. सेरेनाने सुरूवातीला ती गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली नव्हती पण अनावधानाने सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या फोटोंमुळे ती गर्भावस्थेत असल्याचं लोकांना समजलं.
विशेष म्हणजे बाळाला जन्म दिल्यानंतर आता पुढील वर्षाच्या सुरूवातीला होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती खेळणार असल्याचं सेरेनानं म्हटलं होतं. 23 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या सेरेना विल्यम्सने टेनिसच्या इतिहासात अत्यंत तरबेज खेळाडू म्हणून नाव नोंदवलं आहे. अनेक विक्रम सेरेनाने आपल्या नावावर केले आहेत.