नवी दिल्ली : रामकुमार रामनाथनने सोमवारी जाहीर झालेल्या एटीपी रँकिंगमध्ये सात स्थानांची प्रगती करताना कारकिर्दीतील सर्वोत्तम १३३ वे स्थान पटकावले आहे, पण भारताचा अव्वल खेळाडू युकी भांब्रीची मात्र चार स्थानाने घसरण झाली असून तो १०५ व्या स्थानी आहे.२३ वर्षी रामकुमारला एटीपी डेलरे बीच ओपनच्या मुख्य फेरीत स्थान मिळवल्यामुळे १२ मानांकन गुणांचा लाभ झाला, पण त्याला पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला.युकी दुबई ड्युटी फ्री चॅम्पियनशिपच्या पात्रता फेरीत पराभूत झाला. दुबईमध्ये पात्रता फेरीचा अडथळा पार करण्यात अपयशी ठरलेल्या सुमित नागलला चार स्थानांचे नुकसान सहन करावे लागले असून तो २२० व्या स्थानी आहे. एकेरीच्या मानांकनामध्ये प्रजनेश गुणेश्वरनला १० स्थानांचा लाभ झाला असून तो २३२ व्या स्थानी आहे.दुहेरीमध्ये रोहण बोपन्ना २० व्या स्थानासह भारताचा अव्वल खेळाडू आहे. दिवीज शरणला तीन स्थानांचे नुकसान झाले असून तो ५४ व्या तर लिएंडर पेस तीन स्थानांच्या नुकसानासह ५२ व्या स्थानी आहे.महिला एकेरीमध्ये अंकिता रैना पाच स्थानांच्या लाभासह २५० व्या स्थानी आहे तर करमन कौर थंडी २८१ व्या स्थानी कायम आहे. दुहेरीमध्ये सानिया मिर्झा एका स्थानाच्या लाभासह १३ व्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)
टेनिस रॅंकिंग : युकी भांब्रीची घसरण, रामकुमार १३३ व्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 1:27 AM