न्यूयॉर्क, अमेरिकन ओपन टेनिस : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत एक नवा तारा उदयास आला... जपानच्या नाओमी ओसाकाने महिला एकेरीचे जेतेपद पटकावून इतिहास घडवला. जेतेपदाच्या लढतीत आपल्यासमोर लहानपणापासून जिला आदर्श मानले ती सेरेना विल्यम्स आहे, याचे कोणतेही दडपण न ठेवता ओसाकाने सरळ सेटमध्ये बाजी मारली. ग्रँडस्लॅम स्पर्धेतील एकेरीचे जेतेपद जिंकणारी ती पहिली जपानी खेळाडू ठरली, तर लि ना हिच्यानंतर ग्रँडस्लॅम जिंकणारी दुसरी आशियाई महिला टेनिसपटू ठरली. या जेतेपदानंतर ओसाकाच्या मनात नेमक्या कोणत्या भावना दाटल्या असतील याचा अंदाज बांधणे किंवा त्या शब्दबद्ध करणे कठीणचं, परंतु तिच्या या जेतेपदानं जपानच्या दुःखावर आनंदाची फुंकर मारली आहे.
जपानच्या होक्काईडो येथे आलेल्या भुकंपात 30 हून अधिक लोकं मृत्युमुखी पडली आहेत आणि हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. निसर्गाच्या कोपाचा सामना करणाऱ्या जपानवासीयांसाठी ओसाकाचे जेतेपद सुखद गारवा घेऊन येणारे ठरले आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांनी ओसाकाचे अभिनंदन केले आहे. ''अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकल्याबद्दल ओसाकाचे आभार. सध्या संकटांशी दोन दोन हात करणाऱ्या जपानच्या प्रत्येक नागरिकाला तुझे जेतेपद ताकद आणि प्रेरणा देणारे ठरेल,''असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे. जपानच्या ज्या होक्काईडो भागात भुकंप आला तेथे ओसाकाचे 73 वर्षांचे आजोबा तेत्सुओ ओसाका राहतात आणि ओसाकाचा सामना टिव्हीवर पाहताना ते रडत होते. तेत्सुओ यांच्याप्रमाणे जपानमधील प्रत्येक जण ओसाकाने जेतेपदाचा चषक उंचावला त्यावेळी भावूक झाला होता. वयाच्या तिसऱ्या वर्षी ओसाका फ्लोरिडा येथे स्थायिक झाली. आई तमाकी ओसाका जपानची आणि वडील लिओनार्ड फ्रान्सोईस हे हैतीचे... पण, जपानमध्ये जन्म झाल्यामुळे तिला आईचे आडनाव लावावे लागले. तिसऱ्या वर्षी ती कुटुंबासोबत फ्लोरिडा येथे स्थायिक झाली. तिथेच तिने टेनिसचे धडे गिरवले, परंतु ती जपानचे प्रतिनिधित्व करते... म्हणून तिला अमेरिकेतील 'जपानी गुडिया' असे लाडानं म्हणतात...