अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धाः रॉजर फेडररच्या धक्कादायक पराभवानंतर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत बुधवारी आणखी एका चुरशीच्या सामन्याची मेजवानी मिळाली. राफेल नदाल आणि डॉमनीक थिएम यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना रोमहर्षक झाला. अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून ठेवलेल्या या सामन्यात नदालने बाजी मारली. नदालने हा सामना 0-6, 6-4, 7-5, 6-7(4/7), 7-6(7/5) असा जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
अव्वल मानांकित स्पेनच्या नदालला पहिल्याच सेटमध्ये ऑस्ट्रीयाच्या थीएमने धक्का दिला. थिएमने 6-0 अशा फरकाने हा सेट घेत आघाडी घेतली. मात्र, नदालने पुढील दोन सेट 6-4, 7-5 असे जिंकून दमदार कमबॅक केले. चौथ्या सेटमध्ये थिएमने टायब्रेकरमध्ये रंगरलेल्या चुरशीत बाजी मारून आव्हान कायम राखले होते. थिएमने 7-6 ( 7/4) अशा फरकाने हा सेट घेत 2-2 अशी बरोबरी मिळवली.
पाचवा सेटही टायब्रेकरवर गेल्याने चाहत्यांची धाकधुक वाढली. दोन्ही खेळाडूंनी तोडीसतोड खेळ केला. थिएमने नदालची सर्व्हीस ब्रेक करताना दमदार खेळ केला. तत्पूर्वी, महिला एकेरीत अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि लॅटव्हियाची अनास्तासिया सेव्हास्तोव्हा यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. सेरेनाने 1 तास 26 मिनिटांत चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाचा 6-4, 6-3 असा पराभव केला, तर सेव्हास्तोव्हाने अमेरिकेच्या स्लोआन स्टिफन्सचा 6-2, 6-3 असा पराभव केला.