न्यूयॉर्क - अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने यूएस ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत धक्कादायक निकाल नोंदविताना जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या पोलंडच्या इगा स्वियातेकला पराभूत केले. यासह पेगुलाने कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली. दुसरीकडे, पुरुषांमध्ये इटलीच्या यानिक सिन्नरने रशियाच्या दानिल मेदवेदेवला नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
३० वर्षीय पेगुलाने स्वियातेकचे कडवे आव्हान ६-२, ६-४ असे सहज परतावले. गुरुवारी उपांत्य सामन्यात पेगुला झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोवाविरुद्ध खेळेल. मुचोवाने ब्राझीलच्या बीट्रिज हदाद माइया हिला ६-१, ६-४ असे पराभूत केले. पुरुषांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सिन्नरने मेदवेदेवचे तगडे आव्हान ६-२, १-६, ६-१, ६-४ असे चार सेटमध्ये परतावले. सिन्नर आता शुक्रवारी ग्रेट ब्रिटनच्या जॅक ड्रेपरविरुद्ध भिडणार आहे.