न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील तिस-या क्रमांकाची स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझा हिने मोसमातील अखेरची ग्रँडस्लॅम यूएस ओपनमध्ये विजयी सलामी देताना अमेरिकेच्या वार्वरा लेपचेंको हिला सहज नमवले. त्याचप्रमाणे, झेक प्रजासत्ताकची अनुभवी पेत्रा क्वेतोवा हिनेही सरळ दोन सेटमध्ये बाजी मारत विजयी सलामी दिली.यंदाची विम्बल्डन विजेती असलेली मुगुरुझाने जेतेपदाची प्रबळ दावेदार असल्याच्या थाटात आपल्या मोहिमेला सुरुवात करताना वार्वराचा ६-०, ६-३ असा धुव्वा उडवला. केवळ १ तास ३ मिनिटांमध्ये बाजी मारताना मुगुरुझाने वार्वराला कोणतीही संधी दिली नाही.दुसरीकडे, क्वितोवानेही सरळ दोन सेटमध्ये बाजी मारत विजयी सुरुवात केली खरी; परंतु यासाठी तिला सर्बियाच्या जेलेना जांकोविचविरुद्ध चांगलेच झुंजावे लागले. जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानी असलेल्या क्वितोवाने ६८व्या स्थानी असलेल्या जेलेनाची झुंज ७-५, ७-५ अशी मोडून काढली. झेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टीना प्लिस्कोवा हिने दणदणीत विजय मिळवताना जपानच्या मिसा युगुची हिचा ६-२, ६-२ असा फडशा पाडला.त्याचप्रमाणे, फ्रान्सची कॅरोलिन गार्सिया हिने अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या टेरेझा मार्टिनकोवा हिचा ६-०, ६-१ असा धुव्वा उडवत दुसरी फेरी गाठली. (वृत्तसंस्था)
यूएस ओपन - गर्बाइन मुगुरुझाची विजयी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 4:10 AM