न्यूयॉर्क : गतविजेता आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार विजयी घोडदौड कायम राखताना यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अत्यंत रोमांचक झालेल्या आणि पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात नदालने नवव्या मानांकीत डॉमनिक थिएमचे कडवे आव्हान परतावले. दुसरीकडे महिलांमध्ये बलाढ्य सेरेना विलियम्सनेही विजयी आगेकूच करताना उपांत्य फेरी गाठली.बुधवारी रात्री उशीरा झालेल्या सामन्यात नदालने ०-६, ६-४, ७-५, ६-७ (४-७), ७-६ (७-५) असा झुंजार विजय मिळवला. थिएमने धडाकेबाज सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये नदालला एकही गेम जिंकू दिला नाही. परंतु, यानंतर नदालने जबरदस्त झुंज देताना थिएमला अखेरपर्यंत घाम गाळायला लावला. पहिला सेट सहजपणे गमावलेल्या नदालने तिसऱ्या व चौथ्या सेटमध्येही आपली सर्विस गमावली. चार तास ४९ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या मॅरेथॉन लढतीत नदालने आपला सर्व पणास लावत थिएमला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. थिएमने १८ ऐस आणि ७४ विनर मारले, मात्र त्याचवेळी त्याला ५८ चुकांचा फटकाही बसला. उपांत्य सामन्यात नदालपुढे तिसºया मानांकीत युआन मार्टिन डेल पोत्रोचे कडवे आव्हान असेल.डेल पोत्रोनेनेही सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर झुंजार विजय मिळवत जॉन इस्नरचे आव्हान ६-७(५-७), ६-३, ७-६(७-४), ६-२ असे परतावले. याआधी २००९ साली यूएस ओपनचे जेतेपद पटकावलेल्या डेल पोत्रोने कारकिर्दीत तिसºयांदा स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्याचवेळी, या पराभवाने २००३ नंतर यूएस ओपन उपांत्य फेरी गाठणारा पहिला अमेरिकन खेळाडू ठरण्याचे इस्नरचे स्वप्नही धुळीस मिळाले. (वृत्तसंस्था)सहा वेळा यूएस ओपन जेतेपद उंचावलेल्या अमेरिकेच्या बलाढ्य सेरेना विलियम्सने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करताना आठव्या मानांकीत कॅरोलिन प्लिस्कोवाचे आव्हान सरळ दोन सेटमध्ये ६-४, ६-३ असे संपुष्टात आणले. या शानदार विजयासह सेरेनाने उपांत्य फेरीत धडक मारली.२४ ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सेरेनाने सुरुवातीलाच आपली सर्विस गमावली. मात्र यानंतर तिने सलग ८ गेम जिंकताना पहिल्या सेटवर कब्जा करत आघाडी घेतली. यानंतर दुसºया सेटमध्ये ४-० अशी आघाडी घेतल्यानंतर सेरेनाने सहज विजय मिळवला.हा सामना खूप रोमांचक झाला आणि यामध्ये विजय मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण हे योग्य आहे. विजय मिळवल्यानंतर मी डॉमनिकची माफी मागितली. तो शानदार खेळाडू असून माझा खूप जवळचा मित्र आहे. त्याला मोठे जेतेपद पटकावण्यासाठी आणखी संधी मिळतील.- राफेल नदाल
यूएस ओपन; डॉमनिक थिएमला नमवून राफेल नदालची उपांत्य फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 3:14 AM