न्यूयॉर्क : सलग दोन सामन्यांत पाच सेटपर्यंत झुंजावे लागल्यानंतर दिग्गज रॉजर फेडररने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना यूएस ओपनच्या तिसºया फेरीत सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवत आगेकूच केली. दुसरीकडे, राफेल नदाल यानेही आपली घोडदौड कायम राखली असल्याने उपांत्य फेरीत हे दोन्ही दिग्गज एकमेकांविरुद्ध भिडणार असल्याची शक्यता वाढली आहे.आपल्या २० व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या फेडररने धडाकेबाज खेळ करताना स्पॅनिश प्रतिस्पर्धी फेलिसियानो लोपेज याचे आव्हान सरळ तीन सेटमध्ये ६-३, ६-३, ७-५ असे परतवले. विशेष म्हणजे, यासह फेडररने लोपेजविरुद्ध आपला रेकॉर्ड १३-० असा करताना त्याच्याविरुद्धची विजयी मालिका कायम राखली. उपांत्यपूर्व फेरीत जागा निश्चित करण्यासाठी फेडरर फिलिप कोलश्रेबरविरुद्ध लढेल. फेडररने फिलिपला ११ वेळा पराभूत केले आहे. पहिले दोन सामने जिंकताना चांगलेच झुंजावे लागल्यानंतर फेडररने आपला नैसर्गिक खेळ करताना लोपेजला सहज नमवले. या शानदार विजयासह फेडररने १६ व्यांदा यूएस ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. आॅस्टेÑलियाचा सहावा मानांकित डॉमनिक थिएम याने फ्रान्सच्या अॅड्रियन मानरिनोविरुद्ध ७-५, ६-३, ६-४ असा विजय मिळवून अंतिम १६ खेळाडूंमध्ये जागा निश्चित केली. पुढच्या फेरीत थिएमचा सामना २००९ मध्ये यूएस ओपन चॅम्पियन बनलेल्या जुआन मार्टिन डेल पेत्रोविरुद्ध होईल.महिलांमध्ये अव्वल मानांकित कॅरोलिना प्लिसकोवा हिने चीनच्या झांग शुआई हिला नमवून जागतिक क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले. या सामन्यात ती पराभूत झाली असती, तर तिला आपले अव्वल स्थानही गमवावे लागले असते. तीन सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात प्लिसकोवाने ३-६, ७-५, ६-४ असा झुंजार विजय मिळवला. युक्रेनच्या चौथ्या मानांकित एलिना स्वितलोनाने सहज विजय मिळवताना अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सचा ६-४, ७-५ असा पराभव केला. (वृत्तसंस्था)स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदालने अर्जेंटिनाच्या लियोनार्डो मेयरला ६-७ (३-७), ६-३, ६-१, ६-४ असे नमवले. नदालनेही आतापर्यंत मेयरविरुद्ध एकही पराभव स्वीकारला नसून या विजयासह नदालने त्याच्याविरुद्धचा रेकॉर्ड ४-० असा केला आहे.पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतर नदालने ताकदवार आणि वेगवान खेळ करताना मेयरला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. सलग तिन्ही सेट एकतर्फी फरकाने जिंकताना नदालने वर्चस्व राखले. उपांत्यपूर्व फेरीसाठी नदाल युक्रेनच्या अलेक्झांड्रा डोलगोपोलोवविरुद्ध भिडेल. अलेक्झांड्राविरुद्ध नदालचा रेकॉर्ड ६-२ असा आहे.बोपन्ना विजयीमिश्र दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि कॅनडाची गॅब्रिएला डाब्रोवस्की यांनी पहिल्या फेरीत विजय मिळवला. त्यांनी हीदर वॅटसन आणि हेन्री कोन्टीनेन या जोडीला ६-४, ४-६, १३-११ असे पराभूत केले. एक तास १७ मिनिटे चाललेल्या या लढतीत बोपन्ना - डाब्रोवस्की यांनी रोमांचक विजय मिळवत दुसºया फेरीत प्रवेश केला. ३१ मिनिटे चाललेल्या पहिल्या सेटमध्ये बोपन्ना - डाब्रोवस्कीने सहज विजय मिळविला होता. पण, यानंतर त्यांना चांगलेच झुंजावे लागले.
यूएस ओपन : रॉजर फेडररला सूर गवसला, राफेल नदालचीही विजयी घोडदौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 1:07 AM