न्यूयॉर्क : सहावेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या सेरेना विलियम्सने अनास्तासिया सेवास्तोव्हाचा पराभव करीत नवव्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता जेतेपदासाठी सेरेना आणि जपानची नाओमी ओसाका यांच्यादरम्यान अंतिम झुंज रंगणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात धडक मारणारी ओसाका जपानची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.१७ व्या मानांकित सेरेनाचे लक्ष २४ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदावर केंद्रित झाले आहे. गेल्या वर्षी मुलीला जन्म दिल्यानंतर सेरेना दुसºयांदा ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. तिने १९ व्या मानांकित सेवास्तोव्हाचा ६-३, ६-० ने पराभव केला. २० वे मानांकन प्राप्त ओसाका ग्रॅण्डस्लॅम फायनलमध्ये पोहोचणारी जपानची पहिली खेळाडू ठरली आहे. तिने अमेरिकेच्या मेडिसनचा ६-२, ६-४ ने पराभव केला.सेरेनाने आपला प्रवास आश्चर्यचकित करणारा असल्याचे म्हटले आहे. ती म्हणाली, ‘रुग्णालयातील पलंगावरुन उठल्यानंतर वर्षभरात इथपर्यंत मजल मारणे सोपे नव्हते. गेल्या वर्षी या मोसमात मला चालणेही शक्य नव्हते. वर्षभरात दोन ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत धडक मारली. एवढ्या वेगाने येथपर्यंत मजल मारणे, आश्चर्यचकित करणारे आहे.’ (वृत्तसंस्था)सेरेनाने विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली होती. अमेरिकन ओपन स्पर्धेत जर सेरेना विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरली, तर ती क्रिस एव्हर्टचा विक्रम मोडेल आणि आॅस्ट्रेलियाच्या मार्गरेट कोर्टच्या २४ ग्रॅण्डस्लॅम विक्रमाची बरोबरी साधेल.
US Open Tennis 2018: यूएस ओपनमध्ये अंतिम सामन्यात सेरेना - ओसाका भिडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 11:21 PM