न्यूयॉर्क : जुआन मार्टिन डेल पोत्रोने दोन सेट गमावल्यानंतर पाच सेट््सच्या मॅरेथॉन लढतीत डोमिनिक थियेमचा पराभव केला आणि अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. क्वार्टर फायनलमध्ये पोत्रोला पाचवेळचा चॅम्पियन रॉजर फेडररच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.२४ व्या मानांकित अर्जेंटिनाच्या डेल पोत्रोने सहावे मानांकन प्राप्त आॅस्ट्रेलियाच्या थियेमची झुंज १-६, २-६, ६-१, ७-६, ६-४ ने मोडून काढली. डेल पोत्रोने २००९ च्या फायनलमध्ये फेडररचा पराभव करीत एकमेव ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले होते.तिसºया मानांकित फेडररने जर्मनीच्या फिलिप कोलश्रेइबरचा ६-४, ६-२, ७-५ ने पराभव करीत अंतिम ८ खेळाडूंत स्थान मिळवले. कोलश्रेइबरविरुद्ध त्याची कामगिरी १२-० अशी झाली.अव्वल मानांकित राफेल नदालने अमेरिकन ओपन स्पर्धेत विजयाचे अर्धशतक साजरे केले. त्याला आता रशियाच्या आंद्रेई रुबलेव्हच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. रुबलेव्हने नवव्या मानांकित बेल्जियमच्या डेव्हिड गोफिनचा ७-५, ७-६, ६-३ ने पराभव केला. नदालने अलेक्झँडर डोलगोपोलोव्हविरुद्ध ६-२, ६-४, ६-१ ने सरशी साधली. उपांत्य फेरीत नदाल व फेडरर यांची गाठ पडण्याची शक्यता आहे.महिला विभागात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कॅरोलिना प्लिसकोव्हाला उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या कोको वेंडेवेगेच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.अॅस्टोनियाची ४१८ वे मानांकन असलेली केइया कानेपी अंतिम ८ मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. तिने रशियाच्या डारिया कासत्किनाचा ६-४, ६-४ ने पराभव केला. आता उपांत्यपूर्व फेरीत तिला अमेरिकेच्या मेडिसनविरुद्ध लढत द्यावी लागेल. मेडिसनने चौथ्या मानांकित एलिना स्वितोलिनाचा ७-६, १-६, ६-४ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)बोपन्ना आऊटरोहन बोपन्नाचे वर्षाच्या अखेरच्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याला त्याची कॅनडाची सहकारी गॅब्रियला दाब्रोवस्कीसह मिश्र दुहेरीत पराभव स्वीकारावा लागला. भारतीय ज्युनिअर खेळाडूंनाही एकेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. फ्रेंच ओपन चॅम्पियन बोपन्ना व दाब्रोवस्की या सातावे मानांकन प्राप्त जोडीला हाओ चिंग चान व मायकल व्हीनस या तिसºया मानांकित जोडीविरुद्ध ६-४, ३-६, ८-१० ने पराभव स्वीकारावा लागला. पुरुष दुहेरीमध्ये बोपन्ना-पाब्लो क्युवास जोडीला सायमन बोलेली व फाबियो फोगनीनी यांच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. मुलींच्या एकेरीत महक जैनला सहाव्या मानांकित चीनच्या शिन यू वांगविरुद्ध ३-६, ७-६(५), १-६ ने पराभव स्वीकारावा लागला तर मिहिका यादवला तीन सेटमध्ये अमेरिकेच्या निकी रेदेलिकविरुद्ध ४-६, ६-४, १-६ ने पराभव स्वीकारावा लागला. झील देसाईला कोलंबियाच्या १२ व्या मानांकित मारिया कामिला ओसोरियो सेरानोविरुद्ध ६-४, ६-७(५), ६-३ ने पराभव स्वीकारावा लागला.
यूएस ओपन टेनिस : उपांत्यपूर्व फेरीत फेडरर-पोत्रो झुंजणार, नदालची गोफिनवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 12:27 AM