न्यूयॉर्क : जपानच्या १९ वर्षीय नाओमी ओसाका हिने यूएस ओपनच्या महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत खळबळजनक निकाल नोंदवताना गतविजेत्या जर्मनीच्या अँजेलिक केर्बरला पराभूत केले. जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना ओसाकाने केर्बरला सरळ दोन सेटमध्ये धक्का दिला. त्याचवेळी, झेक प्रजासत्ताकची अग्रमानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा हिने अपेक्षित आगेकूच करताना विजयी सलामी दिली.आर्थर अॅश स्टेडियमवर झालेल्या लढतीत नवख्या ओसाकाच्या वेगवान आणि चपळ खेळापुढे केर्बर सपशेल अपयशी ठरली. पहिल्या सेटमध्ये काहीशी झुंज दिल्यानंतर दुसºया सेटमध्ये केर्बर पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. परंतु, ओसाकाने तुफान खेळ करताना केर्बरला पुनरागमनाची कोणतीही संधी न देता पहिल्याच फेरीत अवघ्या १ तास ४ मिनिटांमध्ये स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.
मारियाचे विजयी अभियानासह पुनरागमनउत्तेजक द्रव्यसेवनात १५ महिन्यांच्या बंदीनंतर ग्रॅण्डस्लॅममध्ये पुनरागमन केलेली माजी नंबर वन खेळाडू मारिया शारापोव्हा हिने महिला एकेरीच्या दुसºया फेरीत द्वितीय मानांकित सिमोना हालेपचा २-१ गेमने पराभव करून आपले विजयी अभियान सुरू केले. बंदीनंतर मारिया पुन्हा पुनरागमन करणार असल्यामुळे तिच्या कामगिरीकडे सर्व टेनिस जगताचे लक्ष लागले होते. या स्पर्धेच्या दुसºया फेरीत शारापोव्हाने हालेपचा ६-४, ४-६, ६-३ गुणांनी पराभव करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शारोपोव्हाला गेल्या वर्षी आॅस्ट्रेलिया ओपन स्पर्धेदरम्यान उत्तेजक द्रव्यचाचणीत दोषी ठरविले होते.