US Open Tennis : भारताचा वीर टेनिस सम्राट फेडररला काँटे की टक्कर देतो तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 9:49 AM
US Open Tennis : भारताच्या सुमित नागलने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला कडवी टक्कर दिली.
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा : भारताच्या सुमित नागलने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला कडवी टक्कर दिली. 22 वर्षीय सुमित हा ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत पात्र ठरलेला भारताचा सर्वात युवा खेळाडू आहे. पहिल्याच सामन्यात त्याचा सामना टेनिस सम्राट फेडररशी होता, परंतु त्याचे कोणतेही दडपण न घेता सुमितनं अप्रतिम खेळ केला. या सामन्यात सुमितनं इतिहास घडवला. कारकिर्दीत प्रथमच वरिष्ठ स्थरावरील ग्रँड स्लॅम स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमितनं पाच वेळा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या फेडरलला पहिल्याच सेटमध्ये पराभूत करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सुमितने अमेरिकन ओपनच्या पहिल्याच सामन्यातील पहिला सेट 6-4 असा घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पण, त्यानंतर अनुभवी फेडररने सलग दोन सेट 6-1, 6-2 असे घेत सामन्यात आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये मात्र सुमितने फेडीला झुंजवले. जागतिक क्रमवारीत 190व्या स्थानावर असलेल्या सुमितने चुरशीचा खेळ करताना आव्हान कायम राखण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण, अनुभवाची शिदोरी पाठीशी असलेल्या फेडीनं हा सेट 6-4 असा घेत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पण, या विजयानंतर फेडररने भारताच्या युवा खेळाडूच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.पाहा व्हिडीओ..कोण आहे सुमित नागल?16 ऑगस्ट 1997 साली हरयाणाच्या जझ्झर येथे जन्मलेल्या सुमितने 2015मध्ये विम्बल्डन स्पर्धेतील मुलांच्या दुहेरी गटाचे जेतेपद पटकावले होते. त्याने व्हिएतनामच्या ली होआंग नामसोबत ही कामगिरी केली होती. कनिष्ठ गटाचे ग्रँड स्लॅम नावावर करणारा सुमित हा सहावा भारतीय खेळाडू ठरला. 2016मध्ये त्याने भारताच्या डेव्हिच चषक संघात पदार्पण केले. नवी दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड ग्रुप प्ले ऑफ फेरीत तो स्पेनविरुद्ध खेळला होत. सुमितने या वर्षात मोठी भरारी घेतली. वर्षाच्या सुरुवातीला जागतिक क्रमवारीत 361वरून त्यानं 190व्या स्थानापर्यंत झेप घेतली. त्याने सलग सात स्पर्धांच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
2008मध्ये भारताच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी निवडलेल्या 14 खेळाडूंमध्ये सुमितचा समावेश होता. महेश भुपती आणि कॅनडाचे प्रशिक्षक बॉबी महाल यांनी सुमितला हेरले. सुमितच्या या यशाचे श्रेय त्याचे वडील भुपतीला देतात. 2011मध्ये भुपतीच्या मार्गदर्शनाखाली सुमितने सरावाला सुरुवात केली आणि त्यानंतर तो कॅनडात गेला. तीन वर्ष कॅनडामध्ये राहिल्यानंतर 2014मध्ये सुमित जर्मनीला गेला आणि तेथे अर्जेंटिनाचे प्रशिक्षक मारिआनो डेल्फीनो यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं सरावाला सुरुवात केली.