न्यूयॉर्क : दिग्गज टेनिसपटू व्हीनस विलियम्सला यूएस ओपन टेनिस स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. महिला एकेरीत सध्याची विजेती एम्मा राडुकानू आणि माजी विजेती जपानची नाओमी ओसाका यांचे आव्हानदेखील पहिल्या फेरीत संपुष्टात आले. जूनमध्ये ४२वा वाढदिवस साजरा करणाऱ्या सातवेळेची ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन व्हीनसला एलिसन उयतवांकने ६-१, ७-६ ने पराभूत केले. दरम्यान, राडुकानू ही पहिल्या फेरीत बाहेर पडणारी तिसरी यूएस चॅम्पियन ठरली. तिला एलिजे कॉर्नेटने ६-३, ६-३ने पराभूत केले. राडुकानू मागच्या वर्षी पात्रता फेरीचा अडथळा पार करून मुख्य स्पर्धेत सहभागी झाली शिवाय चॅम्पियन बनली होती.
यूएस ओपन दोनदा जिंकणारी ओसाकादेखील सरळ सेटमध्ये ऑस्ट्रेलियन ओपनची उपविजेती डॅनियल कॉलिन्सकडून ७-६, ६-३ने पराभूत झाली. २०१७ ची विजेती स्लोएन स्टीफेन्स, स्वियातेक, सबालेंका, पेगला, मुगुरुजा, बेनसिच आणि प्लिस्कोवा या महिला खेळाडूंनी एकेरीत विजयासह कूच केली.
राफेल नदालचीही मुसंडीदरम्यान, पुरुष एकेरीत २२ वेळेचा ग्रॅण्डस्लॅम विजेता स्पेनचा राफेल नदाल याने पहिला सेट गमविल्यानंतरही जोरदार मुसंडी मारताना २१ वर्षांचा रिंकी हिजिकाता याच्यावर ४-६, ६-२, ६-३, ६-३ने विजय नोंदविला. नोवाक जोकोविच, ॲण्डी मरे आणि राफेल नदाल या दिग्गजांवर खळबळजनक विजयाची नोंद करणारा अमेरिकेचा ॲम क्वेरी याने यूएस ओपनच्या सलामीला पराभवाचा धक्का बसताच टेनिसला रामराम ठोकला. कॅलिफोर्निया येथील नागरिक क्वेरी मंगळवारी उशिरा बेलारूसचा इल्या इवाश्का याच्याकडून ४-६, ६-४,७-५ ने पराभूत झाला. क्वेरीची कारकिर्दीत सर्वोच्च रॅँकिंग ११ राहिली. त्याने २०१७ ला ॲण्डी मरेला नमवून विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली होती.