न्यूयॉर्क : यजमान देशाची दिग्गज टेनिसपटू व्हीनस विल्यम्स हिने अमेरिकन ओपनमध्ये मंगळवारी २० वर्षे पूर्ण केली. दोन दशकांचा उत्सव तिने आज विजयासोबतच साजरा केला. आर्थर अॅश स्टेडियममध्ये ही स्पर्धा खेळविण्याचे देखील हे २० वे वर्ष असून, या काळात तिने येथे दोनदा स्पर्धा जिंकली.व्हीनसने स्लोव्हाकियाची नवखी खेळाडू व्हिक्टोरिया कुजमोवा हिचा ६-३,३-६, ६-२ ने पराभव केला. १९९७ साली व्हीनस या स्टेडियममध्ये पहिला सामना खेळली. त्या वेळी लाटव्हियाची लॉरिसा नीलॅन्ड हिच्यावर विजय नोंदविला होता. अंतिम सामन्यात मात्र मार्टिना हिंगीसकडून तिला पराभवाचा सामना करावा लागला होता. १९५८ नंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झालेली व्हीनस ही पहिली बिगरमानांकित खेळाडू बनली होती. यानंतर २००० आणि २००१ मध्ये ती स्पर्धेत चॅम्पियनदेखील बनली.३७ वर्षांची व्हीनस यंदा फॉर्ममध्ये आहे. आॅस्ट्रेलियन आणि विम्बल्डनची तिने अंतिम फेरी देखील गाठली आहे. एकाच सत्रात दोन स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची २००३ नंतर व्हीनसची ही पहिली वेळ आहे.पुढील कारकिर्दीविषयी ती म्हणाली, ‘याबाबत विचार केलेला नाही.’ सेरेनासोबतच्या अनुभवाविषयी विचारताच ती पुढे म्हणाली, ‘काही आठवड्यांत लहान बहीण आई बनेल आणि मी मावशी. आम्ही दोघींनी आयुष्यात खेळावर लक्ष दिल्यामुळे दोघींसाठीही वेगळाच अनुभव आहे.’
व्हीनस विल्यम्सचा दोन दशकांचा उत्सव विजयासोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 4:19 AM