लंडन - विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच स्थान मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या केव्हिन अँडरसन आणि जॉन इस्नर यांच्यात जवळपास साडे सहा तास मॅरेथॉन लढत रंगली. पाच सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अँडरसनने 7-6(6), 6-7(5), 6-7(9), 6-4, 26-24 अशा फरकाने बाजी मारली. विम्बल्डनच्या इतिहासातील एकेरीमधील ही सर्वाधिक काळ चाललेली उपांत्य लढत ठरली.
विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रथमच प्रवेश करणा-या केव्हिन अँडरसन आणि जॉन इस्नर यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली. उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या रॉजर फेडररला नमवणा-या दक्षिण आफ्रिकेच्या अँडरसनने पहिला गेम टायब्रेकरमध्ये घेतला, परंतु अमेरिकेच्या इस्नरने पुढील दोन्ही गेम जिंकताना सामन्यात मुसंडी मारली. हे दोन्ही सेट टायब्रेकरमध्ये गेले. तिसरा सेट टायब्रेकरमध्ये 11-9 असा लांबला. इस्नरने 0-1 अशा पिछाडीवरून 6-7 (8-6), 7-6 (7-5), 7-6 (11-9) अशी 2-1 ने आघाडी घेतली.